सत्ता ही माणसाला झेपली नाही, सत्तास्थानी आल्यावर त्याचे मानसिक, नैतिक पातळीवर स्खलन झाले तर त्या व्यक्तीस तर त्याची सजा मिळतेच. परंतु, ज्यांच्यासाठी तो सत्तेवर आलेला असतो त्यांचेही नुकसान होते. विश्वासघात होतो. सत्ता हे असे एक अजब रसायन आहे, की व्यक्तीस त्याची नशा चढते, माज चढतो. हा अंमल इतर अंमलीपदार्थांपेक्षा कधी कधी अधिकच तीव्र आणि घातक स्वरुपाचा असतो. विशेषत: राजकीय सत्ता ही भल्या भल्या माणसांचे कसे मानसिक व नैतिक अध:पतन घडवून आणते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि वर्तमानात आजही पहावयास मिळतात.
महाभारतात दुर्योधनास सत्तेचा मद चढला. त्याने पांडवांना त्यांचा रास्त हिस्सा नाकारला. त्यातून एक शक्तीमान साम्राज्य उद्ध्वस्त झाले. रोमन सम्राट ज्युलियस सिझर हा रोमन जनतेचा अत्यंत लाडका असा पराक्रमी सम्राट. परंतु, सत्ता आणि आपल्या व्यक्तिमहात्म्याने तो स्वत:च बाधित होऊन रोमपेक्षा स्वत:स श्रेष्ठ समजू लागला. तेव्हा त्याने आपलाच नाश ओढवून घेतला. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणत, एखाद्या विश्वस्ताप्रमाणे आर्थिक व राजकीय क्षेत्रातील सत्ताधाऱ्याचे वर्तन असावे. आपल्याकडील सत्ता त्याने निरपेक्षभावाने लोकांच्या कल्याणासाठी वापरावी.
अशी सारी उदाहरणे असूनही सत्तेच्या मोहपाशात जो अडकला, त्याची मन:स्थिती आपणास अडवणारे आता कोणीच नाही अशी बनून तो कोणत्या थरास जाईल, याचा काही नेम नाही. आजच्या जगात अमेरिकेस सारे जग एक प्रगल्भ लोकशाहीवादी देश मानत आले आहे.
तेथील एकूण साक्षरता, संपन्नता, उदारमतवाद, भक्कम संस्थात्मक लोकशाही, लोकशाही संस्थांचा परस्परांवर वचक आणि प्रभाव, यातून निर्माण झालेला समतोल याकडे पहाता अमेरिकन लोकशाही ही इतर देशांच्या तुलनेत अधिक उन्नत आहे असे भासते. परंतु, या प्रगल्भतेस आणि उन्नत स्थितीस आपल्या दुष्कृत्याने काळिमा लावणारे सत्ताधीशही या महासत्तेने पाहिले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आधीच अमेरिकन संसदगृहाबाहेर दंगाधोपा माजवल्याचे आरोप, निवडणूक निकाल नाकारण्याचा आरोप यांनी ग्रस्त असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता आणखी 34 गंभीर आरोप ठेवण्यात आले
आहेत.
ते वैयक्तिक स्वरुपाची आणि ट्रम्प यांच्या नीतीमत्तेची दिवाळखोरी जाहीर करणारे आहेत. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल हिच्यासमवेत शय्यासोबत केल्यानंतर तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी 1 लाख 30 हजार डॉलर्स लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय मॉडेल करेन मॅकडॉगल हिस नकारात्मक वृत्तांकन न करण्यासाठी 1 लाख 15 हजार डॉलर्स दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या साऱ्याच आरोपांनुसार गुन्हे सिद्ध झाल्यास ट्रम्प यांना 136 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या साऱ्या प्रक्रियेदरम्यान ट्रम्प यांना काही काळ अटकही झाली आहे. अमेरिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याच माजी राष्ट्राध्यक्षास अशाप्रकारे अटक झालेली नाही. या आरोपानंतर येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश ट्रम्प यांना देण्यात आले आहेत. त्यावेळी त्यांचे भवितव्य निश्चित
होईल.
अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरील सारे आरोप नाकारले आहेत. ‘अमेरिकेत असे काही घडेल असे मला वाटले नव्हते’ हे वक्तव्य करताना या प्रकरणी मॅनहॅटनचे सरकारी वकील अल्विन ब्राज यांच्यावर अतिडाव्या विचारधारेचे म्हणत, त्यांनी टीका केली आहे.
यात सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या अब्रूच्या एका बाजूस अशाप्रकारे चिंध्या होत असताना दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे आगामी निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांची पाठराखण करणाऱ्यांची संख्या अधिकच वाढत जात असल्याचे सर्वेक्षण अहवाल सांगत आहेत. अर्थात, हवा काहीही असली तरी न्यायालयीन निकालानंतर ट्रम्प अध्यक्षपदासाठी पात्र ठरतील की नाही? हा खरा मुद्दा आहे. अमेरिकेत एकीकडे आपल्यावरील साऱ्या संकटांवर मात करून रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवत निवडणूक लढवण्याचे ट्रम्प यांचे मनसुबे ठाम आहेत तर दुसरीकडे डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार व विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे आपल्या उमेदवारीबाबत अद्याप मौन बाळगून
आहेत.
त्यांचे 80 वर्षांचे वय. जे विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी टर्म पुरी करताना 86 पर्यंत जाईल. हे त्यांच्या मौनाचे आणि डेमॉक्रॅट पक्षाच्या चिंतेचे कारण आहे. एकंदरीतच अमेरिकेत दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारीबद्दल सध्या साशंकता असल्याने राजकीय परिस्थिती काहीशी गोंधळाची आणि अस्थिर बनली आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील जी सुजाण नागरिक मंडळी आहेत, ती काही झाले तरी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी नकोत म्हणून देव पाण्यात घालून बसली आहेत. अमेरिकेच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात दोन राष्ट्राध्यक्ष न्यायालयीन आणि संसदीय कारवाईचे लक्ष्य झाले होते.
1969 ते 1972 दरम्यान रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 1972 च्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होती आणि रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारीत निवडले गेले होते. विरोधी उमेदवार होते डेमॉक्रॅटिक पक्षाचे जॉर्ज मॅकगव्हर्न. ते फारसे लोकप्रिय नव्हते. मात्र, त्याच सुमारास व्हिएतनाम युद्धात निक्सन यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे त्यांची लोकप्रियता घसरू लागली होती. जगभरात आणि खुद्द अमेरिकेत युद्धविरोधी वातावरण निर्माण झाले होते. आपला पराभव होईल या भीतीने निक्सन पछाडले
होते.
अशावेळी डेमॉक्रॅटिक पक्षाचे डावपेच आणि प्रचारनीती समजून घेण्यासाठी वॉशिंग्टन येथील डेमॉक्रॅटिक पक्षाच्या वॉटरगेट इमारतीतील मुख्य कचेरीवर निक्सन यांच्या पाठीराख्यांनी दरोडा घातला. 1972 ची निवडणूक निक्सन जिंकले. मात्र, वॉटरगेट प्रकरणी पुरावे दडपल्याच्या आरोपाखाली 1974 साली त्यांना पायउतार व्हावे लागले. 1999 च्या सुमारास राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे मोनिका लेविन्स्की अनैतिक प्रकरणात गोत्यात आले होते.
अमेरिकन महासत्तेची लक्तरे या प्रकरणी जगभर टांगली गेली. मात्र, विश्वासदर्शक ठराव कारवाईत क्लिंटन थोडक्यात बचावले. आता ट्रम्प मात्र न्यायालयीन कारवाईतच गारद व्हावेत. त्यांना उमेदवारी मिळू नये, अशी सुजाण अमेरिकन नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.
– अनिल आजगावकर








