हल्लेखोरानेही स्वतःवर झाडून घेतली गोळी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिकेत (america) टेक्सासमध्ये (texas) गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच ओक्लाहोमा (Oklahoma) येथे एका वैद्यकीय इमारतीत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर हल्लेखोरदेखील ठार झाला असून पोलीस त्याची ओळख पटवत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयिताने आपल्या पिस्तूलसह वैद्यकीय कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला आणि अचानक गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचाही जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक पोलिसांना बुधवारी सकाळी सेंट फ्रान्सिस रुग्णालय परिसरातील वैद्यकीय इमारतीत एक व्यक्ती शस्त्र घेऊन पोहोचला असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत हल्लेखोराने गोळीबार केला होता. यावेळी या गोळीबारात ४ लोकांचा मृत्यू झालं होता. तर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
हल्लेखोराकडे एक रायफल आणि हँडगन होती. या गोळीबारामागील कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस सध्या हल्लेखोराची ओळख पटवत आहेत. हल्लेखोर ३५ ते ४० वयोगटातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे.