बिगर-नाटो सहकाऱ्याचा दर्जा संपुष्टात येणार
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
पाकिस्तान एकीकडे आर्थिक संकटाला सामोरा जात आहे तर दुसरीकडे अफगाण-तालिबानमुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता अमेरिका पाकिस्तानला मोठा झटका देण्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या संसदेत एका खासदाराने विधेयक सादर केले असून यात पाकिस्तानचा बिगर नाटो सहकाऱ्याचा दर्जा संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव आहे. प्रभावशाली रिपब्लिकन खासदार एंडी बिग्स यांनी संसदेत हे विधेयक मांडले आहे. पाकिस्तान जोपर्यंत हक्कानी नेटवर्कच्या विरोधात सैन्य कारवाई सुरू करत नाही, तोवर त्याला बिगर नाटो सहकाऱ्याच्या दर्जाचे प्रमाणपत्र जारी केले जाऊ नये असे या विधेयकात म्हटले गेले आहे. पाकिस्तानने स्वत:च्या भूमीवर हक्कानी नेटवर्कला स्वत:च्या कारवाया करू देण्याची अनुमती देऊ नये असे या विधेयकात नमूद आहे.
2004 साली अमेरिकेने अल-कायदा आणि तालिबानशी लढण्यासाठी पाकिस्तानला बिगर नाटो सहकाऱ्याचा दर्जा दिला होता. याअंतर्गत पाकिस्तानला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रs, शस्त्रास्त्रविक्री प्रक्रियेत सूट अणि कर्ज कार्यक्रमातही प्राथमिकता मिळत होती. मागील दोन दशकांमध्ये अमेरिकेने याच्या अंतर्गत पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत अन् आधुनिक शस्त्रास्त्रs दिली आहेत. परंतु पाकिस्तानने या मदतीचा वापर दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी नव्हे तर भारताच्या विरोधात केला आहे. ज्या अल-कायदाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स मिळाले, त्याच अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आश्रयास होता. एंडी बिग्स यांनी जानेवारी 2019 मध्ये हे विधेयक पहिल्यांदा अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात मांडले होते, परंतु त्यानंतर याप्रकरणी विशेष प्रगती झाली नव्हती. याचमुळे बिग्स यांनी पुन्हा हे विधेयक मांडले आहे.
युएस कॅपिटलमध्ये पोहोचले ट्रम्प
2020 च्या निवडणुकीत पराभूत अन् 2024 च्या निवडणुकीत विजयी झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदाच युएस कॅपिटलमध्ये गुरुवारी पोहोचले. ट्रम्प यांनी युएस कॅपिटलमध्ये माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांना श्रद्धांजली वाहिली. चार वर्षांनी युएस कॅपिटलमध्ये आल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. यादरम्यान ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांसोबत बैठकाही घेतल्या. ट्रम्प यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत संसदेतील आगामी रणनीतिवर चर्चा केली. ट्रम्प यांनी खासदारांसोबत कॅनडा, पनामा, ग्रीनलँड, कॅलिफोर्नियातील वणव्यावरून विचारविनिमय केला आहे.









