पहिल्या सहामाहीत द्विपक्षीय व्यापार 59.67 अब्ज डॉलर्सवर : चीन दुसऱ्या क्रमांकावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि घटती निर्यात आणि आयातीनंतरही अमेरिका चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाडीत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 11.3 टक्क्यांनी कमी होत 59.67 अब्ज डॉलर्स राहिला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या या कालावधीत हा आकडा 67.28 अब्ज डॉलर्स इतका होता.
एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेला होणारी निर्यात कमी होत 38.28 अब्ज डॉलर्सवर आली आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 41.49 अब्ज डॉलर्स इतके राहिले होते. अमेरिकेकडून होणारी आयात देखील कमी होत 21.39 अब्ज डॉलर्सवर आली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीत हे प्रमाण 25.79 अब्ज डॉलर्स हेते.
अशाचप्रकारे भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार देखील 3.56 टक्क्यांनी कमी होत 58.11 अब्ज डॉलर्सवर आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनला होणारी निर्यात 7.74 अब्ज डॉलर्स राहिली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा 7.84 अब्ज डॉलर्स होता. चीनकडून होणारी आयात कमी होत 50.47 अब्ज डॉलर्सवर आली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीत 52.42 अब्ज डॉलर्सची आयात चीनकडून करण्यात आली होती.
जागतिक मागणी घटतेय
जागतिक मागणी कमजोर राहिल्याने भारत आणि अमेरिकेतील व्यापारात घट दिसून येत असली तरीही व्यापार वृद्धी लवकरच सकारात्मक होणार आहे. आगामी वर्षांमध्ये अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार वाढण्याचा कल कायम राहणार आहे, कारण दोन्ही देश आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.









