अनेक भागांमध्ये आणीबाणीची स्थिती : लाखो घरांचा वीजपुरवठा ठप्प
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत दाखल झालेले हेलेन चक्रीवादळ अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक दक्षिणपूर्व भागांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हेलेन हे विध्वंसक श्रेणी 4 च्या चक्रीवादळात रुपांतरित झाले आहे. यामुळे अमेरिकेत चालू वर्षात दाखल झालेले हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. राष्ट्रीय महासागरीय आणि वायुमंडळीय प्रशासनाने महासागराचे तापमान उच्चांकी राहणार असल्याचे म्हणत यंदा अटलांटिक महासागरात अधिक चक्रीवादळे निर्माण येणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. हेलेन या क्षेत्रात मागील अनेक वर्षांमध्ये धडकलेल्या सर्वात मोठ्या चक्रीवादळांपैकी एक ठरणार असल्याचा अनुमान आहे.
युएस नॅशनल हरिकेन सेंटरनुसार या चक्रीवादळामुळे 215 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात. चक्रीवादळामुळे फ्लोरिडात अडीच लाखाहून अधिक घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. फ्लोरिडाच्या बिग बेंड भागात या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. चक्रीवादळामुळे 6 मीटर उंचीपर्यंत लाटा समुद्रात निर्माण होऊ शकतात. हा मोठा धोका पाहता फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून उत्तर जॉर्जिया अणि पश्चिम कॅरोलिनापर्यंतच्या भागात इशारा जारी करण्यात आला आहे.