वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वीजनिर्मितीसाठी जगभरात दगडी कोळशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे वायूप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विद्युतनिर्मितीसाठी कोळशाचा उपयोग थांबविण्याचे अभियाने हाती घेण्यात आले असून अमेरिकेनेही या अभियानाला पूर्ण समर्थन व्यक्त केले आहे.
अमेरिकेच्या समर्थनाची माहिती अमेरिकेचे विशेष दूत जॉन केरी यांनी शनिवारी दिली. अमेरिका यापुढे कोणतेही नवे कोळसा सयंत्र निर्माण करणार नाही. तसेच सध्या कार्यरत असलेली कोळसा सयंत्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. अमेरिकेने अशी योजना सज्ज केली आहे. मात्र, किती कालावधीत ही सयंत्रे बंद करण्यात येतील यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
इतर देशांसह काम करणार
वायुमंडल स्वच्छ राखण्यासाठी अमेरिका शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. तसेच इतर देशांनाही सहकार्य करणार आहे. लवकरात लवकर प्रदूषणकारी ऊजास्रोतांचा उपयोग बंद करण्याचा अमेरिकेचाही निर्धार असून त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. अमेरिका या संदर्भात चीन आणि भारत या देशांशीही संपर्कात असून कोळशाचा उपयोग कमी करण्यासाठी या देशांना उद्युक्त करीत आहे. कोळशाचा इंधन म्हणून उपयोग थांबविण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. त्यासाठी अन्य देशांना तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक सहकार्य करण्याचीही अमेरिकेची तयारी आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या इतर अधिकाऱ्यांनीही केले.









