► वृत्तसंस्था / झुहेई
2024 च्या टेनिस हंगामातील सुरू असलेल्या डेव्हिस चषक फायनल्स टेनिस स्पर्धेत अमेरिकेने स्लोव्हाकियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत शेवटच्या 8 संघामध्ये स्थान मिळविले. आता डेव्हिस चषक फायनल्समध्ये अमेरिका, जर्मनी, स्पेन आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
अमेरिका आणि जर्मनी हे दोन्ही एकाच गटात असून त्यांनी आतापर्यंत एकही पराभव पत्करलेला नाही. स्पेन आणि फ्रान्स यांच्यातील ब गटातील लढतीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने फ्रान्सच्या हंबर्टचा 6-3, 6-3, स्पेनच्या अॅग्युटने फ्रान्सच्या फिल्सचा 2-6, 7-5, 6-3 असा पराभव केला. स्पेनच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाने ब गटातून शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले आहे.
झुहेई येथे झालेल्या अमेरिका आणि स्लोव्हाकिया यांच्यातील लढतीत अमेरिकेच्या मॅकडोनाल्डने स्लोव्हाकियाच्या क्लिनचा 6-4, 6-3, अमेरिकेच्या नाकाशिमाने स्लोव्हाकियाच्या कोव्हेलीकचा 6-3, 6-3 असा पराभव केला. मात्र दुहेरीच्या सामन्यात स्लोव्हाकियाच्या क्लिन आणि गॉंबोस यांनी अमेरिकेच्या क्रेझीसेक व राजीव राम यांचा 6-7(4-7), 7-6(7-4), 10-1 असा पराभव केला. बोलोगेना येथे झालेल्या अन्य एका लढतीत इटलीने बेल्जीयमचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. आता अ गटातून इटली, बेल्जीयम आणि नेदर्लंड हे संघ शेवटच्या दोन स्थानासाठी लढत देतील. तर इटलीची आगामी लढत हॉलंडबरोबर तसेच बेल्जीयम व ब्राझील यांच्यात लढत होईल. मात्र ब्रिटनने पुढील फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी गमविली. ड गटातील लढतीत अर्जेटिंनाने ब्रिटनचा 2-1 असा पराभव केला.









