कॅनडा आणि आयएसआय समवेत ड्रग टेरोरिझम
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमली पदार्थ दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे चीन, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि कॅनडा यांनी रचलेले कारस्थान अमेरिकेच्या अमली पदार्थ विरोधी प्राधिकारणाने उघड केले आहे. हे कारस्थान आयएसआयमधील धर्मांध लोक, चीनमधील रासायनिक पदार्थांचे पुरवठादार आणि कॅनडातील काही टोळ्या तसेच दक्षिण अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या टोळ्या यांनी केले होते.
डीईए या प्राधिकरणाने या कारस्थानाचा पर्दाफाश 2022 मध्येच केला होता. त्यानंतर चौकशीला प्रारंभ करण्यात आला होता. ही चौकशी 2023 मध्येही केली गेली होती. आता या अमेरिकेतल्या प्राधिकरणाने या कारस्थानाचा ठोस पुरावा सादर केला असून सविस्तर प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. अमेरिकेने प्रारंभी हा तपास गुप्त ठेवला होता. आता त्याची माहिती उघड केली गेली आहे.
अनेक देशांमध्ये पाळेमुळे
या अमली पदार्थाच्या रॅकेटचे स्वरुप आंतरराष्ट्रीय असून यात अनेक देश गुंतलेले आहेत. दक्षिण अमेरिकेतील ब्रिटीश कोलंबिया या देशात मोठ्या प्रमाणात ‘फेंटानाईल’ हा घातक अमली पदार्थ उत्पादित केला जातो. तो तेथून अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पाठविला जातो. या विक्री रॅकेटमध्ये चीन आणि कॅनडा या देशांमधील अनेक अवैध टोळ्या आणि रासायनिक पदार्थांच्या पुरवठादारांचा समावेश आहे. मूळचा भारतीय वंशाचा, पण आता कॅनडाचा नागरिक असलेला ओपिंदरसिंग सियान हा या रॅकेटचा एक मुख्य सूत्रधार आहे, अशी माहिती डीईए या संस्थेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे देण्यात आलेली आहे.
राजकीय नेत्यांचाही संबंध
हे रॅकेट चालविण्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे नेतेही गुंतलेले आहेत. या रॅकेटचा भाग असलेले चीनमधील रासायनिक पदार्थ पुरवठादार हे चीनच्या सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. एक मुख्य सूत्रधार सियान याच्या कुख्यात ‘ब्रदर कीपर्स गँग’चे संबंधही या राजकीय नेत्यांशी आहेत. ही टोळी कॅनडात कार्यरत असलेल्या मेक्सिकोच्या सिनालोआ टोळीची उपटोळी आहे, अशी खळबळजनक माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली असून त्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
आयर्लंडचाही संबंध
या आंतरराष्ट्रीय आणि व्यापक अमली पदार्थ रॅकेटशी आयर्लंड या देशातील किनाहान टोळीचाही संबंध आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या महारॅकेटशी संबंधित 40 जणांची ओळख पटविली असून या रॅकेटमध्ये एकंदरीत 1 हजारांहून अधिक लोक काम करीत असावेत, असे अनुमान आहे.
भारताचाही दुजोरा
अमेरिकेच्या प्राधिकरणाने उघड केलेल्या या कारस्थानासंबंधीच्या माहितीला भारतानेही दुजोरा दिला आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी या कारस्थानाची काही माहिती अमेरिकेला पुरविली होती, असे बोलले जात आहे. ओपिंदरसिंग सियान हा कॅनडाचा नागरिक पाकिस्तानातील लाहोर येथे कार्यरत असणाऱ्या आयएसआय या संघटनेचा मध्यस्थ म्हणून काम करतो. तो कॅनडातील टोळ्या आणि चीनमधील रासायनिक पदार्थांचे पुरवठादार यांच्यातील दुवा म्हणून काम करतो, अशी माहिती भारताकडेही असल्याचे भारतीय गुप्तचर संस्थांचे प्रतिपादन आहे.









