अंतराळ क्षेपणास्त्र सुरक्षा प्रकल्प : अब्जावधी डॉलर्सचा येणार खर्च
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाकांक्षी गोल्डन डोम क्षेपणास्त्र सुरक्षा प्रकल्पाची घोषणा केली आहे. आम्ही गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स शील्डविषयी ऐतिहासिक घोषणा करत आहोत. रोनाल्ड रीगन (अमेरिकेचे 40 वे अध्यक्ष) ही प्रणाली अनेक वर्षांपूर्वी इच्छित होते, परंतु त्यावेळी तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. परंतु आता ही प्रणाली आमच्याकडे असेल, आम्ही या प्रणालीला सर्वोच्च स्तरावर नेणार आहोत असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान विदेशी क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा ढाल निर्माण करणार असल्याचे आश्वासन मी दिले होते. हे आश्वासन आम्ही पूर्ण करत आहोत असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स शील्डचा उद्देश क्षेपणास्त्रांचा शोध घेणे, त्यांना ट्रॅक करणे आणि रोखण्यासाठी उपग्रहांचे जाळे तयार करणे आहे. क्षेपणास्त्रांचा शोध घेत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी शेकडो उपग्रह प्रक्षेपित केले जाऊ शकतात.
आयर्न डोमद्वारे प्रेरित
गोल्डन डोमकरता अब्जावधी डॉलर्स खर्च होण्याचा अनुमान आहे. डेमोक्रेटिक खासदारांनी या प्रकल्पात ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या भागीदारीविषयी चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलचे रक्षण कवच आयर्न डोमद्वारे गोल्डन डोमची कल्पना प्रेरित आहे. अमेरिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षा अनेक पट मोठा असणार आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि अन्य मोठ्या धोक्यांना ध्वनिपेक्षा वेगाने ही प्रणाली रोखणार आहे. ही प्रणाली अनेक उपग्रहांशी जोडलेली असल्याने ती अमेरिकेचे रक्षण करेल आणि प्रसंगी आकाशातून शस्त्रास्त्रs डागण्यास सक्षम असणार आहे.
लागू करण्यास अनेक वर्षे
आयर्न डोम क्षेपणास्त्र आणि रॉकेट्सपासून इस्रायलचे रक्षण करते. तर अमेरिकेची गोल्डन डोम प्रणाली लागू होण्यास अनेक वर्षे लागणार आहेत. रिपब्लिकन खासदारांनी 150 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण पॅकेजच्या हिस्स्याच्या स्वरुपात गोल्डन डोमसाठी 25 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक गुंतवणुकीला प्रस्तावित केले आहे, परंतु अमेरिकेच्या संसदेत हा प्रस्ताव संमत करविणे ट्रम्प प्रशासनासाठी सोपे ठरणार नाही.









