पणजी : पर्यटनस्थळांचे जतन करण्यासाठीचे कायदा दुरुस्ती विधेयक आज सोमवार दि. 28 जुलै रोजी विधानसभा पावसाळी अधिवेशनात विचारार्थ येणार असून त्यावर सत्ताधारी – विरोधी आमदारांकडून बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या विधेयकानुसार कायदा मोडल्यास मोठ्या रक्कमेच्या दंडाची तरतूद त्यातून करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे दुरुस्ती विधेयक मांडणार असून पर्यटनस्थळांवर किंवा समुद्रकिनारी पर्यटकांच्या मागे लागून त्यांना त्रास करणाऱ्या लोकांना हे विधेयक महागात पडणार आहे. एजंट किंवा इतर कोणाकडूनही क्रूझ बोटी वा इतर कोणत्याही सेवेच्या तिकीट विकण्यात आल्या तर त्यांना रु. 5000 ते रु. 1 लाखापर्यंतची दंडाची शिक्षा होणार असल्याचे विधेयकातून नमूद करण्यात आले आहे.
समुद्रकिनारी किंवा इतर पर्यटन स्थळांवर काही वस्तू, सामान घेण्यासाठी अनेक विक्रेते पर्यटकांच्या मागे लागतात. त्यांनी नको म्हटले तरी पाठ सोडत नाहीत. त्यामुळे पर्यटकांना त्रास होतो. ते कंटाळतात अशा अनेक तक्रारी सरकार दरबारी आल्याने त्याची दखल घेऊन हे दुरुस्ती विधेयक तयार करण्यात आले आहे. उघड्यावर जेवण तयार करणे, बाटल्या, कचरा टाकणे, समुद्रकिनारी वाहने चालवणे हे प्रकारही रोखण्यासाठी सदर विधेयकाचा उपयोग होणार आहे. दंडाच्या रक्कमेचा दर दोन वर्षांनी आढावा घेतला जाणार असल्याचे विधेयकात नमूद आहे.









