मागण्यांच्या पूर्ततेसाठी विश्वकर्म संघातर्फे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : विश्वकर्मा समाजातील नागरिकांना हिंदू पांचाळ विश्वकर्मा असे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विश्वकर्म सेवा संघ यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. विश्वकर्मा समाजातील नागरिकांना हिंदू मराठा असे जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यामुळे समाजातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेताना अडचण जात आहे. याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. सदर चूक दुरुस्त करून विश्वकर्मा समाजातील नागरिकांना हिंदू पांचाळ विश्वकर्म (ओबीसी 2 ए) असा नामोल्लेख करून प्रमाणपत्र द्यावे. यासाठी अनेकवेळा निवेदन दिले आहे. मात्र याची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचण ठरत आहे. ही अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी योजनांचा लाभ द्या
सरकारच्या योजनांपासून वंचित असणाऱ्या या समाजातील नागरिकांना बीपीएल कार्ड मंजूर करण्यात यावे, विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ करून देण्यात यावा, शिष्यवृत्ती देण्यात यावी, गोरगरीब नागरिकांना गृहयोजनेचा लाभ द्यावा, कामगार खात्याकडून कामगार कार्ड वितरण करण्यात यावे. शेतकऱ्यांना किसान कार्ड वितरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये बेळगाव, संकेश्वर, खानापूर, चिकोडी, रायबाग, निपाणी आदी भागातील विश्वकर्मा समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी रमेश देसूरकर, बाळू सुतार, राजू सुतार, जोतिबा लोहार, संदीप मंडोळकर, अरुण देसूरकर आदी उपस्थित होते.









