विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय : जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : चन्नम्मा चौकामध्ये होणाऱ्या आंदोलनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सदर चौकात आंदोलन करण्यास निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र यावर कार्यवाही होताना दिसत नाही. आंदोलनांमुळे वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे. तर रुग्णवाहिका अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून चन्नम्मा चौकाला ओळखले जाते. या चौकातूनच शहरांतर्गत व तालुक्याच्या परिसरातील गावांना ये-जा करणारी वाहने याच मार्गावरुन मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे हा चौक नेहमीच नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक संस्था, कामगार संघटनांकडून या चौकामध्येच आंदोलने केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. तर अनेकवेळा वाहतूक मार्गात बदल करावा लागतो. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चौकात आंदोलनांवर निर्बंध घाला
प्रामुख्याने या चौकाच्या शेजारीच जिल्हा रुग्णालय असल्याने या चौकातूनच रुग्णवाहिकांना ये-जा करावी लागते. अनेकवेळा रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्ण वाहिकांना आंदोलनांमुळे रहदारीच्या कोंडीत अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे या चौकात आंदोलनांवर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









