रुग्णालयातील रुग्णांनाही डीजेच्या आवाजाचा नाहक त्रास : पोलिसांनी कानात कापूस घालून बजावली सेवा
बेळगाव : शहरातील महत्त्वाचा रहदारी चौक असणाऱ्या चन्नम्मा चौकामध्ये कर्णकर्कश आवाजात नंगानाच करणाऱ्या कन्नडिगांमुळे रुग्णवाहिका अडकून पडल्याची घटना बुधवारी राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान घडली. तर रुग्णवाहिका गर्दीतून बाहेर काढेपर्यंत वाहनचालकाला चांगलीच कसरत करावी लागली. चन्नम्मा चौकातूनच शहरातील वाहनांची ये-जा असते. या चौकामध्ये राज्योत्सव मिरवणूक काढण्यात आल्याने या परिसरात असणाऱ्या रुग्णालयांना ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांना मिरवणुकीचा फटका बसला. चन्नम्मा चौकात जवळच असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांनाही कर्णकर्कश आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागला. क्लब रोड, चन्नम्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कॉलेज रोड या सर्व रस्त्यांवर असणाऱ्या खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयातील रुग्णांना डीजेच्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागला.
या आवाजामुळे अनेकांना रक्तदाब वाढल्याचा त्रास झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. क्लब रोडवर मोठ्या आवाजात सुरू असणाऱ्या डीजेमुळे रुग्णांनी डॉक्टरांकडे तक्रार केल्याने काहीकाळ या रस्त्यावरील डीजे बंद करण्यात आले होते. मात्र थोड्या वेळाने पुन्हा धिंगाणा सुरू झाला. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना दिवसभरापासून रात्री उशिरापर्यंत त्रास सहन करावा लागला. आवाजाच्या प्रदूषणाबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन लक्ष देऊन भविष्यामध्ये असा प्रकार घडू नये, यासाठी काय उपाययोजना करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालयात सेवा बजाविणाऱ्या डॉक्टरांनाही याचा त्रास सहन करावा लागला. रुग्णांशी संवाद साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मिरवणूक मार्गात बदल करा
कित्तूर चन्नम्मा चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज रोड या परिसरातील मिरवणूक मार्ग पूर्णपणे बंद करावा. त्याऐवजी हवे तर किल्ला तलावापासून महांतेशनगर परिसरात मिरवणूक काढल्यास कोणालाही त्रास होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा फटका
मिरवणुकीत बंदोबस्तासाठी नेमणूक केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा फटका बसला. कानामध्ये कापूस घालून सेवा बजावावी लागली. तर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आवाजापासून दूर राहून सेवा बजावली. काही पोलिसांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांना रात्री उशिराने दवाखाने गाठावे लागले आहेत. हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडूनही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन याची दखल घेणार का? हे पहावे लागणार आहे.









