वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष स्वत:चा राजकीय गोतावळा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यानुसार गुरुवारी ॲम्ब्युलन्स मॅन पद्मश्री पुरस्कार विजेते जितेंद्र सिंह शंटी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभा अध्यक्ष आणि ‘आप’चे शाहदरा येथील आमदार रामनिवास गोयल यांनी गुरुवारीच सक्रीय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. यानंतर आप सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी शंटी यांना पक्षात आणले आहे. आम आदमी पक्ष आता रामनिवास गोयल यांच्या जागी शंटी यांना शाहदरा मतदारसंघाची उमेदवारी देणार असल्याचे मानले जात आहे.
मी राजकारणापासून खूप दूर गेलो होतो, परंतु आता केजरीवालांनी माझ्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आणि मी विचार करण्यासाठी काही वेळ मागितला होता. आम्ही दोघेही जनसेवेशी जोडलेलो आहोत आणि दोघेही भगत सिंह यांचे अनुयायी आहोत. याचमुळे आता जिवंत लोकांची मदत करण्यासाठी मी आम आदमी पक्षात आलो आहे असे उद्गार शंटी यांनी काढले आहेत. गोयल यांनी काही दिवसांपूर्वी पत्र पाठविले होते. मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यात यश आले नाही. प्रचारात ते आमच्यासोबत असतील, त्यांचे मार्गदर्शन मिळत राहणार असल्याचे केजरीवालांनी नमूद पेले आहे.









