लोकसहभागातून माडखोल सेवा संघाचा आदर्शवत उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गावचे ग्रामदैवत श्री पावणाई मंदिर येथे होणार आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा दिवस माडखोल गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाणार असुन ही हक्काची रुग्णवाहिका माडखोल परिसरासाठी जीवनदायी ठरणार आहे.माडखोल परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अनेकवेळा रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे आपल्या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी हक्काची रुग्णवाहिका असावी या उद्देशाने माडखोल सेवा संघाने सहा महिन्यांपूर्वी लोकसहभागातून रुग्णवाहिका घेण्याचा संकल्प केला. त्यानंतर रुग्णवाहिकेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर माडखोलवासियांसह त्यांच्या आप्तेष्ट व मित्र परिवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रुग्णवाहिकेमुळे माडखोल गावात इतिहास घडला. अवघ्या ६ महिन्यात या लोकचळवळीत ११ लाखाहून अधिक लोकवर्गणी गोळा झाली. माडखोल सेवा संघाने माडखोलवासियांच्या सहकार्याने ही किमया घडवून आणली आहे. यात अवघ्या २५ रुपयापासून ते काही हजार रुपयापर्यंतच लाखमोलाच्या लोकवर्गणीचा समावेश असुन परोपकाराच्या जाणीवेतून समाजातील सर्व घटकांनी या रुग्णवाहिकेसाठी योगदान दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे या रुग्णवाहिकेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा त्यांच्या नेत्यांची मदत घेण्यात आलेली नाही. माडखोलवासियांसाठी हक्काच्या रुग्णवाहिकेचे माडखोल सेवा संघाचे अखेर स्वप्न साकार झाले असुन माडखोल परिसराच्या आरोग्य सेवेसाठी माडखोल सेवा संघाकडून आदर्शवत सेवाभावी कार्य घडले आहे. या रुग्णवाहिकेमुळे माडखोल हे गाव स्वतःची रुग्णवाहिका असणारे गाव ठरणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माडखोल सेवा संघाकडून करण्याचा आले आहे.









