राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात सेवेत होते
आंबोली : आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवरून शुक्रवारी सायंकाळी ३०० फूट खोल दरीत कोसळलेले कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.
सह्याद्री अॅडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीम, आंबोली आणि सांगेली तसेच एनडीआरएफची टीम आणि फॉरेस्ट पथकाने ही मोहीम यशस्वी केली. रेस्क्यू टीमचे सदस्य आणि फॉरेस्ट रेस्क्यू टीमचे राकेश अमृसकर, एनडीआरएफचे श्याम थापाळे यांनी वायररोपच्या आधारे ३०० फूट खोल दरीत उतरत राजेंद्र यांचा मृतदेह स्ट्रेचरच्या सहाय्याने बाहेर काढला.
घटनास्थळी सकाळपासूनच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि त्यांची टीम उपस्थित होती. चौथा शनिवार असल्याने पर्यटकांची गर्दी या पॉईंटवर होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दरीतील मृतदेह बाहेर काढेपर्यंत कावळेसाद पॉईंट बंद ठेवला होता. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी सोडले. मृतदेह बाहेर काढल्यावर तो विच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
नातेवाईकांची गर्दी
राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात सेवेत होते. यावेळी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. मृत राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने सहकाऱ्यांना व कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दुपारी उशिरा विच्छेदन करून राजेंद्र यांचा मृतदेह त्यांचे मामेभाऊ अमोल अनिल नाळे यांच्या ताब्यात देण्यात आला.
सकाळी मोहीम हाती
शनिवारी सकाळी सह्याद्री अॅ डव्हेंचर आणि रेस्क्यू टीम आंबोली व सांगेली तसेच वनविभागाची रेस्क्यू टीम, एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी जात बायर रोपच्या सहाय्याने मृतदेह दिसतो का, याची चाचपणी केली. तेव्हा त्यांना जवळच मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर बायररोपच्या सहाय्याने राकेश अमृसकर, श्याम थापाळे यांनी खाली उतरत मृतदेह बाहेर काढला. याची माहिती राजेंद्र यांच्यासोबत आलेले उत्तम बावरे (वय ४०, कसबा बावडा) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रुमालामुळे गमावला जीव
राजेंद्र सनगर यांनी आपला रुमाल दरीच्या दिशेने फेकला. तो रुमाल वर आला. त्यांनी पुन्हा रुमाल दरीच्या ठिकाणी फेकला, तोदेखील वर आला. परंतु परत येताना भिजून ओला झाल्याने दरीच्या कडेला रेलिंगच्या पलिकडे पडला. तो रुमाल आणण्यासाठी ते रेलिंगवरून आत उतरले.
त्यावेळी त्या चिखलमय भागात त्यांचा पाय घसरून ते डोक्याच्या बाजूने ३०० फूट खोल दरीत कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. या दुर्घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आवाज दिला. परंतु खालून कोणताही प्रतिसाद
मिळाला नाही.








