संपूर्ण रस्ता खड्डेमय ; बांधकामच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा ; बबन साळगावकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
कोकणच्या पर्यटनाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटात रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालीय . सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या भागातील रस्ता संपूर्ण उकडला गेला असून खराब झालेला आहे. त्यामुळे बांधकामच्या अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली . आंबोली रस्ता आहे की मृत्यूचा सापळा ? या रस्त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना पडतोय. त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जातोय . दक्षिण कोकणातील हे थंड हवेचे ठिकाण इंग्रजांच्या काळापासून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे . आज इथल्या पर्यटनाला रस्ते पूरक नसल्यामुळे फटका बसत आहे. तसेच अनेक वाहनांची तोडमोड, अपघात होऊन नुकसान होत आहे. बरीच वाहने अपघात ग्रस्त होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या भागातील रस्ता संपूर्ण उकडला गेला असून खराब झालेला आहे याचा फटका स्थानिक आंबोलीवासीयांना ,व्यापारी, हॉटेल व्यवसायिक यांना बसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली हा रस्ता झालेला आहे. हा रस्ता करत असताना ज्या अभियंत्यांना या रस्त्याचे कंत्राट दिले होते या त्यांच्यावरती जबाबदारी टाकून फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी साळगावकर यांनी केलेली आहे.









