कॅबिनेट बैठकीत निर्णय : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
सावंतवाडी : प्रतिनिधी
गेली पिढ्यानपिढ्या भिजत घोंगडे असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली -चौकुळ -गेळे कबूलायतदार गावकर जमीन प्रश्न अखेर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सुटला आहे . आता या तिन्ही गावातील जमिनी शेतकऱ्यांच्या सातबारावर लागणार आहेत. एका दिवसात महाराष्ट्र शासनाच्या नावे सातबारा करण्यात आले होते. त्यानंतर गेली कित्येक वर्ष हा प्रश्न रखडून होता. आता मात्र या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी या जमिनीचा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रश्नासाठी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे, गेली दोन दशकांहून अधिक काळ या जमीन प्रश्नाबाबत राजकीय पटलावर विषय होता. आता हा प्रश्न सुटला आहे . सर्वात महत्त्वाचा हा निर्णय असून या गावात मोठा उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.









