प्रचंड वाहतूक कोंडी : अपुरा पोलीस बंदोबस्त
वार्ताहर/आंबोली
वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी दुतर्फा वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली. बंदोबस्तासाठी केवळ चारच वाहतूक पोलीस तैनात होते. दुपारी एक वाजताच मुख्य धबधबा ते मुख्य दरडींपर्यंत वाहतूक कोंडी झाली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण स्वत: वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घटनास्थळी हजर होते. गेले दोन-तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आंबोली घाटातील मुख्य धबधबा थोड्याफार प्रमाणात प्रवाहित झाला असून रविवारी पर्यटकांनी आंबोलीत गर्दी केली होती. पर्यटक मोठी वाहने घेऊन येत असल्याने आणि पार्किंग व्यवस्था मर्यादित असल्याने दरवर्षी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. मुख्य धबधबा परिसरात एरवी पोलीस बंदोबस्त जास्त असतो. आणि घाटात ठराविक अंतरावर रस्त्याच्या एकाच बाजूला वाहने पार्क करत असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होते. मोठी वाहने फॉरेस्ट चेकपोस्टवर अडवून चौकुळ रोड व एम. टी. डी. सी. ग्रामपंचायत पार्किंग येथे पार्क केल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होते. परंतु पहिल्याच रविवारी केवळ सात वाहतूक पोलीस कर्मचारी फॉरेस्ट चेकपोस्ट ते मुख्य धबधबा परिसरात तैनात होते. त्यामुळे घाटातील सर्वच ठिकाणी वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.








