प्रतिनिधी/ बेळगाव
अंबीगर चौडय्या यांचे दुसरे नाव निजशरण आहे. कारण ज्या काळात कोणत्याही मुद्द्यावर तडजोड केली नाही, आपले विचार सत्य आणि चिकाटीने समाजापर्यंत पोहोचविले आहेत, त्यांचे हे विचार जयंती साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील युवकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक खाते, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंबीगर चौडय्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. शनिवारी सकाळी 10 वाजता किल्ला तलावापासून कित्तूर चन्नम्मा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी कलश घेऊन भाग घेतला होता.
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही आपले विचार व्यक्त केले. मिरवणुकीचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, गंगाधर तळवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









