एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेत्री एंबर हर्ड स्वत:च्या मीरा या जुन्या भूमिकेत पुन्हा दिसून येणार आहे. पूर्वाश्रमीचा पती जॉनी डेपसोबतच्या खटल्यानंतर अभिनेत्रीला या चित्रपटातून हटविण्यात आल्याची अफवा पूर्वी पसरली होती.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आर्थर करी (जेसन मोमोआ) ब्लॅक मंटा (याह्या अब्दुल-मतीन द्वितीय)सोबत एका नव्या धोक्याचा सामना करताना दाखविण्यात आले आहे. पहिल्यांदा एक्वामॅनला पराभूत करण्यास अपयशी ठरल्यावर ब्लॅक मंटा पुन्हा एकदा लढाईसाठी तयार आहे. तो अजून स्वत:च्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवू पाहत आहे. यावेळी त्याच्याकडे आणखी शक्ती आहेत, असे निर्मात्यांनी ट्रेलर शेअर करत म्हटले आहे. जेम्स वान यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात निकोल किडमन आणि डॉल्फ लुंडग्रेन तसेच टेमुएरा मॉरिसन हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित ‘एक्वामॅन’चा सीक्वेल असणार आहे.









