‘इन द फायर’ चित्रपटात दिसून येणार
हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड स्वत:चा पूर्वाश्रमीचा पती जॉनी डेप याच्याविरोधात खटला हरल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहे. कॅलिफोर्नियातील स्वत:चे घर विकून एम्बर आता मुलगी ऊनाग पॅगेसोबत स्पेनमध्ये स्थायिक झाली आहे. एम्बर स्वत:च्या मुलीला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवू पाहत आहे. याचमुळे तिने हे पाऊल उचलले आहे.
एम्बरने हॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलेला नाही. तिच्याकडे काही प्रोजेक्टस आहेत. एम्बर हर्ड लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एम्बर प्रतिष्ठित टॉरमिना फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसून येणार आहे. ‘इन द फायर’ या चित्रपटासाठी एम्बर तेथे हजेरी लावणार आहे. कॉनर एलिन यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत एडुआर्डो नोरिगो मुख्य भूमिकेत आहे.

‘इन द फायर’ या चित्रपटाचा प्रीमियर 24 जून रोजी चित्रपट महोत्सवात होणार आहे. एम्बर यावेळी रेड कार्पेटवर कोनोर एलिन आणि एडुआर्डो नोरिगोसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात ती एका मनोचिकित्सकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीचा असल्याने यात 1899 मधील पार्श्वभूमी दर्शविण्यात आली आहे.
जॉनी डेपने मागील वर्षी एम्बर हर्ड विरोधातील खटला जिंकला होता. यानंतर एम्बर कुठल्याही मोठ्या सोहळ्यात दिसून आली नव्हती. तर जॉनी अलिकडेच ‘जीन डू बॅरी’ या फ्रेंच चित्रपटातून झळकला होता. या चित्रपटाद्वारे त्याने तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते.









