बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे येथे जयंती सोहळा उत्साहात
रत्नागिरी प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.राज्य शासनाच्यावतीने आंबडवे येथे बाबासाहेबांच्या 132 व्या जयंती उत्सवाचे निमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळीआमदार योगेश कदम, अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजश्री गायकवाड, प्रांत अधिकारी राजश्री मोरे, तहसिलदार संजय भिसे, विभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरक्षक शैलजा सावंत, समाजकल्याण सहआयुक्त यादव गायकवाड, दलित मित्र दादासाहेब मर्चंडे, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, सुदर्शन सकपाळ, सुदाम सकपाळ, रमेश दळवी, प्रताप घोसाळकर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशास दिलेल्या संविधानामुळे आज आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने कार्यरत आहोत. बाबासाहेबांचा विचार जिल्ह्यात सर्व जनतेपर्यंत पोहचावा याकरिता आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावी शासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या जंयत्तीचा कार्यक्रम आगामी काळात चैत्यभूमी प्रमाणेच लाखो आंबेडकरी अनुयायी आंबडवे येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील असा जगास हेवा वाटावा असा जयंतीचा कार्यक्रम करण्याचा व त्यासाठी नियोजन व आवश्यक तो सर्व प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जातील असे पालकमंत्री म्हणाले.
सामंत म्हणाले राज्य सरकार आपल्या मागे ठामपणे उभे आहे येथील स्मारक व महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्नाकरिता कुलगुरुंसह सर्व संबंधिताना आंबडवे येथे आणुन सर्व प्रश्न पुढील महिन्याभरात मार्गी लावणार असल्याचे सांगताना जगास हेवा वाटेल असे बाबांसाहेबांचे स्मारक आंबडवे येथे उभे करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्र पुरुषांचे चरित्र पुस्तक रुपाने पोहचावे याकरिता आवश्यक ती सर्व शासकीय यंत्रणा उभी करणार असल्याचे यावेळी सांगितले. शासनाच्यावतीने येथे साजऱ्या कऱण्यात आलेल्या पहिल्या जंयतीचा एक घटक होण्याचा सन्मान मिळणे हाच माझा सत्कार व गौरव असल्याचे सांगताना हा ऐतिहासिक दिवस नेहमीच स्मरणात राहिल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे औचीत्यसाधून तहसील कार्यालय मंडणगड यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते.









