वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सातत्याने अपमानच केला आहे. राजकीयदृष्ट्या त्यांचे महत्व वाढू नये म्हणून काँग्रेसने नेहमी कटकारस्थाने केली. डॉ. आंबेकडर यांची भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका होती. तसेच भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीतही त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान होते. तथापि, काँग्रेसने स्वत:च्या सत्तालोलुपतेपोटी नेहमीच त्यांचे महत्व लपविण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
प्रत्येक भारतीयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर आणि सन्मान आहे. भारतीय जनता पक्षाने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या पक्षाने त्यांचा नेहमीच आदर केला असून पुढेही आम्ही तो करीत राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचा इतिहास अपमान करण्याचाच
काँग्रेसने इतिहासकाळापासूनच दलितांचा अवमान केला आहे. दलितांना त्यांचे वास्तविक अधिकार मिळू नयेत, ही काँग्रेसची भूमिका होती. काँग्रेसने नेहमीच धार्मिक अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाचा मार्ग स्वीकारुन दलितांचा अपमान केला आहे. धार्मिक अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यासाठीच काँग्रेसने देशाच्या फाळणीत महत्वाची भूमिका घेतली होती. डॉ. आंबेडकरांना घटनेची रचना करणाऱ्या घटनासमितीत स्थान मिळू नये, अशी काँग्रेसची इच्छा होती. काँग्रेसला आंबेडकरांची राजकीय स्पर्धा वाटत होती, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.









