शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असलेली आणि नामांतर काळापासून प्रदीर्घ काळ रखडलेली शिवशक्ती-भीमशक्ती (आंबेडकर आणि ठाकरे) युती अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीदिनी दोन्ही बाजूंना मान्य झाली. त्यानुसार प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. दोन्ही बाजूंच्या अनुयायांच्या दृष्टीने ही एक भावनिक वाटचाल आहे. ती युती प्रत्यक्ष मैदानात यशस्वी करण्याची जबाबदारी असेल ती प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांच्यावर! त्यावर घराणेशाहीचा आरोप रामदास आठवले करतात की भाजप आणि शिंदे गटातील कोणी नेते यालाही महत्त्व असणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेला डोळय़ासमोर ठेवून ही युती झालेली आहे. इथली सत्ता ही शिवसेनेला प्राणवायू वाटतो. तो तोडण्यासाठी भाजपने शिवसेना फोडल्याचे प्रयत्न सध्या परिणाम दाखवत आहेत. हितसंबंधाच्या राजकारणातून केलेले विकेंद्रीकरण उद्धव ठाकरे यांना 2002 सालापासून यश देत आले होते. त्या जोरावर नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे पक्ष सोडण्याचे धक्के पचवूनही ते उभे राहिले. पण जेव्हा ईडी, सीबीआयच्या भयाने असो किंवा हिंदुत्व सोडल्याचा मुद्दा मान्य करून असो, हितसंबंधितांनी बंड केले तेव्हा तो भुजबळ, राणे, राज यांच्यापेक्षा मोठा धक्का ठरला. अर्थातच तरीही शिवसैनिक सोबत राहिल्याने ठाकरेंचे आव्हान कायम राहिले. हा धक्का बसण्यापूर्वी 2014 सालीच उद्धव ठाकरे सावध झाले होते. बाळासाहेबांच्या मृत्यू पश्चात अवघ्या दोन वर्षांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने युती तोडली तेव्हा त्यांनी एकटय़ाच्या बळावर निवडणूक लढवून अभूतपूर्व यश मिळवले. मात्र तेव्हा पवारांनी भाजपच्या सत्तेच्या गाडीला खांदा दिला. ठाकरेंना भाजपाशी त्यांच्या अटींवर तडजोड करावी लागली. मात्र सत्तेत आल्यानंतर आपले उपद्रवमूल्य कायम ठेवून सैनिकांना जागृत ठेवत राहिले. परिणामी 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांनी केला. हा प्रयोग करताना बाळासाहेबांचा अधिक प्रबोधनकार ठाकरे यांचा हिंदुत्ववाद यांचे मिश्रण करून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत स्वतःला जोडून घेतले. बऱयाचदा भाजपने त्यांना अडचणीत आणले तर राम मंदिर, काश्मीरी पंडित अशा मुद्यांवर उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींना अडचणीत आणले. परिणाम अखेर शिवसेना फुटण्यात झाला. आता नवा प्रयोग गरजेचा होता. त्यावेळी त्यांनी आपल्या अधिकारात निवडला तो आणखी एक प्रयोगशील नेता, प्रकाश आंबेडकर! 1994 साली भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आपल्या गटाचा विस्तार करत त्यांनी भारीप बहुजन महासंघ स्थापन केला. अकोला पॅटर्न हा आगळावेगळा प्रयोग करून दाखवला आणि 2014 पर्यंत त्यांना कमी, अधिक यश मिळत राहिले. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा एक तरी आमदार व्हायचा. पण मतांची टक्केवारी एक टक्क्याच्या पुढे गेली नाही. या काळात दलित कार्यकर्त्यांना प्रतिक्रियावादी न होण्याची त्यांनी शिकवण दिली. परिणामी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातील दलित सवर्ण दंगली जवळपास संपुष्टात आल्या. खैरलांजी येथील दलित कुटुंबावरील अत्याचार आणि अहमदनगर जिह्यातील मराठा मुलीवरील अत्याचार अशा काही दुर्दैवी घटना वगळता गावागावातील संघर्ष आटोक्मयात आला. त्याचा राजकीय फायदा आंबेडकर आणि खेडेकरांना लाभला नाही. 2018 सालापासून आंबेडकरांनी नवा प्रयोग केला आणि आपल्या पूर्वीच्या प्रयोगाला अधिक व्यापक करत ओबीसी, भटके यांच्यासह आदिवासी, मुस्लिम, छोटे ओबीसी अशा घटकांना एकत्र करत आंबेडकरीजनतेसह वंचित बहुजन अशी आघाडी स्थापन केली. याच वर्षाच्या मे महिन्यात पंढरपूरमध्ये झालेला धनगर मेळावा प्रचंड मोठा झाला. नंतर सोलापूरमध्ये त्याहून मोठा प्रतिसाद लाभला. लक्ष्मण माने, हरिदास भदे, विजय मोरे असे नेते त्यांना जोडले गेले आणि 2019 च्या मार्च महिन्यात त्यांच्या पक्षाची नोंदणी झाली. लगेचच्या 17व्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमशी युती केली आणि सर्व 48 जागांवर आपले उमेदवार उभे केले. हेच त्यांचे मोठे यश होते. त्यात एमआयएमचा केवळ एकमेव उमेदवार विजयी झाला 47 जागी हार पत्करावी लागली. पण 7.64 टक्के मते त्यांनी घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मुस्लिमांची मते आपल्याला मिळाली नाहीत म्हणून त्यांनी युती तोडली. मात्र विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचे धाडस दाखवले त्यामध्येही 24 लाख म्हणजे साडेचार टक्क्याहून अधिक मते मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेकांची आमदारकी वंचितमुळे हुकली. भाजपची बी टीम असा आरोप झाला. लोकसभेला धनगर, माळी, भटके, ओबीसी छोटे, ओबीसी आणि मुस्लिम या सहा घटकांना 12 जागा सोडा ही त्यांची मागणी मान्य न केल्याचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला वेळकाढूपणा आणि प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्यावर केलेला वैचारिक आघात खूप मोठा होता. उद्धव ठाकरे यांच्याशी युती करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपला शरद पवार यांच्याशी जुना झगडा आहे. मात्र त्यांच्याशी युती करण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले. शरद पवार यांचे नाव घेतले असले तरी मराठा आपल्याशी जोडला जावा, असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते हे त्यातले मुख्य गमक आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्यामागे वंचितचा एक मेळावा कारणीभूत आहे. मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी राहत असणाऱया दोनशे गावठाणांचे सीमांकन, प्रॉपर्टी कार्ड आणि झोपडपट्टी पुनर्वसन या लोकांच्या विचाराने व्हावे ही भूमिका घेऊन आंबेडकरांनी शिवाजी पार्क मैदानावर एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याच्या गर्दीची तुलना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी झाली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते.
Previous Articleअत्याधुनिक तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा
Next Article महिलांचा वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघाची निवड
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









