प्रत्येक दिवसाच्या दुपारच्या अलंकार पूजेवेळी मळवट भरण्याची परंपरा : अर्धा पाऊण तास चंदन ओगाळल्यानंतर मिळतो वाटीभर गंध, केशर, तुळस, भिमसेनी कापूरचाही असतो गंधात समावेश
कोल्हापूर/संग्राम काटकर
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीकडे पाहताच क्षणी लक्ष वेधून घेतो तो कपाळवरील (लल्लाटी) मळवट. देवीच्या साजश्रृंगाराचाच मळवट हा एक भाग आहे. चंदनाच्या लेपाने भरला जाणारा हा मळवट पूर्वापार आहे. तो मूर्तीचे सौंदर्य तर खुलवतोच, शिवाय भाविकांमध्ये प्रसन्नताही आणतो. मळवट भरण्याकडे एक विलक्षण कला म्हणून पाहिले जाते. शिवाय अर्धा-पाऊण तास एकाच लयमध्ये चंदन ओगाळ्यानंतर मळवटासाठीचा वाटीभर गंध मिळतो. रोज दुपारी साडे बारा वाजता केल्या जाणाऱ्या अलंकार पूजेवेळी अंबाबाईच्या कपाळी चंदन लेपाने मळवट भरला जातो. मळवट भरण्याचे काम पुजारी अगदी बिनचुकपणे करतात. मळवटात कुंकुवाने चंद्रकोर, श्रीयंत्र, फुले, तारा यासह विविध प्रकारच्या डिझाईनही उमटवल्या जातात. ही डिझाईनसुद्धा अंबाबाईच्या पुजेच्या सौंदर्यात भर घालत असते.
अंबाबाईच्या कपाळी चंदनाचा मळवट केव्हापासून भरला जात आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. यातूनच मळवट भरण्याची परंपरा ही किती पूर्वापार आहे हेच सिद्ध होत आहे. दोन ते तीन मिलीमीटर जाडीमध्ये अंबाबाईला भरला जाणारा चंदनाचा मळवट तयार करण्यासाठी हळद, कुंकु, पाणी, केशर, भिमसेनी कापूर व तुळस यांच्या मिश्रणाचा वापर केला जातो. त्यामुळेच मळवटाचा सुंगध संपूर्ण गाभाऱ्यासह मंदिराच्या पितळी उंबरठ्याच्या अंतरंगात सतत दरवळत असतो. भाविक उबंरठा ओलांडून आतमध्ये गेला की तो सुंगध घेऊन प्रसन्न होतो. अंबाबाईची पूजा ही भाविकांमध्ये प्रसन्नता, चैतन्य आणि उल्हास निर्माण करत असते. तर मळवट हा भाविकांचे लक्ष वेधून घेत असतो. एखाद्या दिवसाला सण-उत्सवाच्या औचित्य असेल तर अंबाबाईची विविध ऊपात वैशिष्ट्यापूर्ण पूजा बांधली जातात. या पुजेचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरासह परगावचे लोक आवर्जुन मंदिरात येतात. नवरात्रोत्सवात तर सलग दहा दिवस दहा ऊपांमध्ये अंबाबाई भाविकांसमोर प्रगट होत असते. विविध ऊपात पूजा बांधताना एका महात्म्याचा प्रआधार घेतला जातो. या महात्म्यातून पूजेतून धार्मिक महत्वही उलघडत असते. अंबाबाईच्या पूजचे सौंदर्य आणि सौंदर्यातून प्रसन्नता पसरण्याचे काम अंबाबाईच्या कपाळावरील चंदनाचा मळवटच करत असतो.
दुपारच्या पुजेवेळी अंबाबाईच्या मूर्तीला भरला जाणारा चंदनाचा मळवट हा दिर्घ काळ घट्ट राहिल इतके पाणी घेऊनच सहाणावर चंदन ओगाळण्याचे काम करावे लागते. कारण पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्ती झाल्यास अंबाबाईच्या कपाळी मळवट चांगल्या प्रकारे बसत नाही. शिवाय चंदन ओगाळताना पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी अंबाबाईच्या कपाळी मळवट फार काळ टिकून राहत नाही, याची दक्षता घेऊन चंदन ओगाळण्याचे काम केले जाते. शिवाय अर्धापाऊण तास ओगाळून मिळालेला चंदनाचा गंध दररोज अंबाबाईच्या अलंकार पूजेपूर्वी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांकडे सुपूर्त केला जातो. दुपारी अंबाबाईला भरलेला मळवट दुसऱ्या दिवशी पहाटे साडे पाच वाजताच काढला जातो. काढलेला हा मळवट मंदिरातील भाविकांना दिला जातो. शिवाय अंबाबाईच्या कपाळाचा मळवट मिळण्याला भाग्याचे समजले जाते. जो भाविक आपल्या कपाळी मळवट लावतो त्याच्या नाकात दिवसभर सुगंध दरवळणार हे मात्र नक्की आहे.
मळवट बनवण्यासाठी देसाई कुटुंबाची तिसरी पिढी सध्या कार्यरत
अंबाबाईसाठी चंदनाचा मळवट बनवून देण्याची परंपरा साठ वर्षापूर्वी (कै.) आनंदी गणेश देसाई (रा. जूनी कोटीशाळा, बिनखांबी गणेश मंदिराजवळ) यांनी एक सेवा म्हणून सुरु केली. आनंदी यांच्या निधनानंतर चिरंजीव भास्कर व नंदकुमार यांनी मळवट बनवण्याची परंपरा चालू ठेवली. दोघे आपल्या आईने आणलेल्या दगडी सहाणावर चंदनाचे खोड ओगाळून मळवट बनवत होते. अर्धा ते पाऊण तास ओगाळल्यानंतर मळवटासाठी वाटीभर चंदना गंध त्यांना मिळत होता. हा गंध दुपारच्या अलंकार पूजेपूर्वी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांकडे दिला जात होता. पंधरा वर्षांपूर्वी वयोमानामुळे भास्कर व नंदकुमार यांनी चंदन ओगाळण्याची सेवा बंद केली. मात्र नंदकुमार देसाई यांचे चिरंजीव चैतन्य यांनी चंदन ओगाळण्याची परंपरा सुरु ठेवली. ते आजही न चुकता चंदनाचा गंध बनवून तो अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांकडे देत आहेत. गेल्या काही वर्षापासून शिवाजी पेठ, पोतनीस बोळातील उत्तराधी मठाच्या गुरुजींकडूनही चंदनाचा मळवट अंबाबाईच्या सेवेसाठी दिला जात आहे.









