मूर्ती संवर्धन, नाईकवाडेंना पदमुक्त केल्याच्या वादाचा फटका, दांडेलीहून येणारे सागवाणी लाकूड अद्याप जंगलातच
कोल्हापूर/संग्राम काटकर
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सौंदर्याचा एक नमुना असलेला लाकडी गरुड मंडप अंतिम घटका मोजत आहे. मंडपाच्या खांबांचा जमिनीतील भाग सडला आहे. मंडप कोसळू नये म्हणून त्याच्या चार खांबांना दगड व लोखंडी पटट्यांचा सपोर्ट दिला आहे. चार महिन्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व माजी सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंडपाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला होता. पण दरम्यानच्या काळात दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच दांडेलीहून (कर्नाटक) आणले जाणारे सागवाणी लाकूडही साधे मंदिरात आणलेले नाही.
राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालयालयाकडून गरुड मंडप नुतनीकरणासाठीची परवानगी घेऊन मे अखेरपर्यंत म्हणजे पावसाळ्याआधी काम करण्याचे ठरले होते. पण परंतू कोणीच पुढाकार न घेतल्याने मंडप आजही जैसे थे अवस्थेत आहे. त्यामुळे नुतनीकरणाचे काम आता पावसाळ्यानंतरच होणार हे स्पष्ट आहे. नक्षीकामाचा एक विजोड नमूना असलेला गऊड मंडप कसा उभारला गेला हा एक औत्स्युक्याचा विषय आहे.
अंबाबाई मंदिर व मंदिरासमोरील महाद्वार यांच्या मधोमध एक दगडी सदर होती. या सदरेवर अंबाबाईचे अनेक धार्मिक विधी होत होते. या धार्मिक विधींसाठी एक निवारा असावा म्हणून करवीर संस्थानचे छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत म्हणजेच 1838 ते 1845 या दरम्यान सदरभोवतीने आणि अंबाबाई मंदिराला लागूनच नक्षीदार लाकडी गरुड मंडप उभारला गेला. त्याचा डोलारा 20 फुटी 8 लाडकी खांबावर पेलला आहे. शिवाय मंडपाच्या अन्य 40 खांबांना असलेल्या नक्षीदार लाकडी कमानीही मंडपाचे सौंदर्य खुलवत आहेत.
या मंडपातील सदरेवर पालखी सोहळ्यानंतर विराजमान केली जाणारी अंबाबाईची उत्सवमूर्ती मंडपात चैतन्य पसरवते. गेल्या अनेक वर्षांपासून देवीच्या अभिषेकाचे विधीही या मंडपातच होत आहे. दरवर्षीच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तर मंडपातील सदरेवरील झोपाळ्यात बसून झुला घेणारी अंबाबाई अशी बांधली जाणारी पूजा पाहण्यास भाविकांची गर्दी होत असते.
गरुड मंडपाचा डोलारा पेलणारे चार खांब सडले
धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व असलेल्या या गरुड मंडपाचा छताचा काही भाग निसटल्याचे देवस्थान समितीच्या वर्षभरापूर्वी निदर्शनास आले होते. 8 महिन्यांपूर्वी मंडपातील फरशी काढल्यानंतर मंडपाचा डोलारा ज्या 20 फुटी 8 लाकडी खांबांवर उभा आहे, ते खांब सडल्याचे दिसले. मंडपात सतत होत राहिलेल्या अभिषेकाचे पाणी खांबात झिरपत राहिल्याने ते सडून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज ना उद्या मंडपाच्या अस्तित्वाला धोका पोहोचेल असा निष्कर्षही पुढे आला. यातून देवस्थान समितीने मंडप नूतनीकरणाचा निर्णय घेतला. हेरिटेज समितीची परवानगीही घेऊन चार महिन्यांपूर्वी नूतनीकरणासंदर्भातील प्रस्ताव राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालयालयाचे संचालक गर्गे यांची मुंबईत भेट घेऊन देण्यात आला.
नाईकवाडे व अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी तर सागवाणी लाकुड शोधण्यासाठी दांडेलीतील (कारवार, कर्नाटक) जंगल गाठले. तेथील व्यवस्थापनासोबत सध्या गऊड मंडपाचे ज्या आकार व उंचीमध्ये खांब आहेत, त्याप्रमाणे खांब बनण्यासाठी 10 हजारावर सागवाणी झाडांची पाहणी केली. यातून मंडपाचा डोलारा पेलणाऱ्या 20 फुटी 8 खांबासाठी 10 आणि अन्य खांबांसाठी 40 झाडे मिळाली. ती लवकरच कोल्हापुरात आणायाची असेही ठरले होते. परंतू दरम्यानच्या काळात अंबाबाई मूर्ती संवर्धनावरून देवस्थान समिती, पुजारी व हिंदुत्ववादी संघटना यांच्यात वाद उफाळला. या वादाला जोडूनच नाईकवाडे यांच्याकडील देवस्थान समिती सचिवपदाचा पदभार काढून घेतल्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली. हा वाद शासन दरबारी आजही सुरू असल्याने आजतागायत गऊड मंडप नुतनीकरणाचा श्रीगणेशाच झालेला नाही. त्यामुळे आता मंडपाचा डोलारा आणखी किती दिवस दगड, लोखंडी सपोर्टवर पेलत ठेवायचा याचा आता देवस्थान समितीने गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
आर्किटेक्टकडून आराखडा मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात
गरुड मंडप नुतनीकरणासाठी राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालयालयाने मान्यता देऊन आर्किटेक्ट नेमून दिला आहे. त्यांनी मंडपाची मापे घेतली आहे. मापांनुसार ते आराखडा बनवून तो देवस्थान समितीकडे सुपूर्द करतील. त्यानंतर मंडप नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती देवस्थान समितीचे प्रभारी सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली.









