कोल्हापूर :
ख्रिसमसबरोबरच जोडून आलेल्या शनिवार–रविवारच्या शासकीय सुट्टीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातील हजारो भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत. गेल्या सात दिवसात देवदेवतांचे दर्शन आणि पर्यटन असे संपूर्ण नियोजन कऊनच कोल्हापूरात आलेल्या सात लाखांवर भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. शुक्रवारी तर पहाटेपासून परगावचे भाविक मोठ मोठ्या वाहनाने कोल्हापूरात दाखल होत होते. त्यांचा मोर्चा विविध मार्गावऊन अंबाबाई मंदिराकडे वळत होता. त्यामुळे मंदिराच्या चारी बाजूंना असलेल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी पहायला मिळाली. मंदिर परिसर तर क्षणाक्षणाला भाविकांनी गजबजून जात होता.
गजबजलेल्या वातावरणातच शुक्रवारी दिवसभरात तब्बल 1 लाख 45 हजारावर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दुपारी 12 ते 3 यावेळेत तर अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील दर्शन रांग जूना राजवाड्याच्या नगारखान्यामधून भाऊसिंगजी रोडवर सतत येत होती. दरम्यान, डिसेंबर महिना हा निव्वळ कोल्हापुरातील पर्यटना भेटी देण्यासाठी राखीव असतो. ख्रिसमस सणाला जोडून येणाऱ्या शासकीय सुट्टया आणि वर्षाअखेरीला नोकरीतील शिल्लक रजा घेऊन दरवर्षी भाविक मौज–मजा लुटण्यासाठी कोल्हापूर गाठणे हा जणू भाविकांचा एक कलमी कार्यक्रमच असतो असे दरवर्षी पहायला मिळते.
सध्याच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्याचे औचित्य साधत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातील भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत. शुक्रवारी तर दिवसभर सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, पुणे, पिंपरी–चिंचवड, नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, विदर्भ, मराठवाड्यातील येथील लाखावर भाविक कोल्हापूरात येत होते. दाही दिशांनी प्रत्येक मिनिटा–मिनिटाला भाविकांच्या येण्याने सारे कोल्हापूर शहरच गजबजून गेले होते. दसरा चौक, बिंदू चौकातील वाहनतळ तर पहाटेपासूनच वाहनांनी हाऊसफुल्ल होत होते. ज्या भाविकांना वाहनतळांवर वाहने लावायला जागा मिळत नव्हती, त्यांना रंकाळा तलावनजिकच्या राजघाट रोड ते खराडे कॉलेज या रोडवर वाहने लावण्यासाठी जावे लागत होते. काहींना तर अंबाबाई मंदिरापासून थोडे आंतर लांब जाऊन ज्या रस्त्यावर जागा मिळेल तेथे वाहने लावावी लागली. अंबाबाई मंदिरालाही चोहो बाजूंनी भाविकांचा वेढा पडत होता. धर्मशाळा, यात्रीनिवास, वसतीगृहे भाविकांनी हाऊसफुल्ल झाली होती. सकाळी अकरानंतर कोल्हापूरात आलेल्या हजारो भाविकांना यात्रीनिवासचा आसराच मिळाला नाही.
अशा सगळ्या गजबजपुरीत भाविक अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, करवीरनगर वाचन मंदिर, चप्पल लाईन, लक्ष्मी रोड, राजारामपुरी येथील बाजारपेठांकडे लोक खरेदीकडे जात होते. त्यामुळे बाजारपेठाही गजबजून गेल्या होत्या. भाविकांनी मनसोक्त नवीन कपडे, साड्या, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कोल्हापूरी मसाले, कोल्हापुरी चप्पल यासह विविध वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे कोट्यावधीच्या घरात उलाढालही झाली. खरेदीनंतर सर्वांची वाहने नवीन राजवाड्यातील म्युझियम, टाऊनहॉलमधील म्युझियम, वाडीरत्नागिरी, खिद्रापूर, नृसिंहवाडी, पन्हाळगड, विशाळगड यासह जिह्यातील पर्यटनस्थळांकडे वळत होती. सायंकाळी 7 वाजेपर्यंत हेच चित्र कायम होते.








