केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री जी. श्रीपाद नाईक यांची माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली भेट
Ambabai Temple : पर्यटन वाढीच्या दृष्टीने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा केंद्र शासनाच्या “प्रसाद” योजनेअंतर्गत समावेश व्हावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar ) यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री जी. श्रीपाद नाईक (Minister G. Shripad Naik) यांच्याकडे केली आहे.
राजेश क्षीरसागर यांनी दिल्ली येथे जी श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन कोल्हापूरच्या (Kolhapur) पर्यटन विकासासंदर्भात चर्चा केली. यावेळी क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. देशभरातून कोट्यवधी भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. तसेच अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव सोहळाही देशभर प्रसिद्ध आहे.नवरात्र उत्सवासाठी देशभरातून सुमारे 25 लाख भाविक मंदिरात दाखल होतात. दरम्यान ,मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. यामध्ये वाहनतळ, भक्तनिवास, दर्शन रांगांची व्यवस्था,अन्नछत्र यासह मंदिर सुरक्षिततेसाठी बॅग स्कॅनर इत्यादींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचं क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांना सांगितलं. अंबाबाई मंदिरासारख्या मोठ्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी केंद्र शासनाच्या वतीने “प्रसाद” ही योजना सुरू करण्यात आली आहे .या योजनेत श्री अंबाबाई मंदिराचा समावेश झाल्यास कोल्हापुरातील धार्मिक पर्यटनास वाढ होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. केंद्र शासनाच्या “प्रसाद” योजनेमध्ये मंदिराचा समावेश होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ९१.८० कोटींचा आराखडा केंद्राकडे सादर केला आहे.
आराखड्यामध्ये माहिती केंद्र, ई- पास केंद्र,स्वच्छतागृहे, लॉकर्स, अन्नछत्र ,मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण,विद्युतीकरण, दिशादर्शक फलक, इलेक्ट्रिक बस व्यवस्था, मोठे पार्किंग, भाविकांसाठी भक्तनिवास , मंदिराचे संरक्षण आणि दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था यासह मंदिर परिसरातील मनिकर्निका कुंड आणि काशी विश्वेश्वर कुंड यांची दुरुस्ती या विकास कामांचा समावेश करण्यात आलाय अशी माहिती क्षीरसागर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री नाईक यांना प्रत्यक्ष भेटून दिली. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिराचा समावेश केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत करून ९१.८० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी विनंती राजेश क्षीरसागर यांनी मंत्री नाईक यांच्याकडे केली आहे.