अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँडवर आज महानगर पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज पोलीसांच्या फौजफाटा आणि जेसीबीच्या सहाय्याने चप्पल स्टँड मालकांच्या आणि महिलांच्या प्रचंड विरोधानंतरही कारवाई करत हि स्टँड हलवले. यावेळी महिलांनी प्रचंड आक्रोश करत प्रशासनाचा निषेध केला. ही कारवाई करताना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली गेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
नवरात्रोत्सवाच्या तोंडावर कोल्हापूर महानगर पालीकेने अंबाबाई परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उचलला. परिसरात असणाऱ्या टपऱ्या, फेरीवाले यांच्यासह चप्पल स्टँडवर ही करावाई करण्यात आली. यावेळी चप्पल मालक आणि महिलांनी आक्रोश करत या कारवाईचा निषेध केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू जाधव यांनी या कारवाईला विरोध करून निषेध केला. त्यांनी चप्पल स्टँडवरील कारवाई करण्यापुर्वी आयुक्तांनी ईथे येऊन चप्पल स्टँड धारकांशी चर्चा करावी असे आवाहन केले.
महापालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येत असलेली कारवाई पाहून छाती पिटाळून आक्रोश केला. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महिलांनी शंखध्वनी केला. तसेच पोलीसांनी महिलांसोबत दुर्व्यवहार केला असल्याचा आरोपही केला.
यावेळी बोलताना चप्पल स्टँडचे मालक म्हणाले, “आम्ही गेले 24- 25 वर्षे अंबाबाईच्य़ा परिसरात हा व्यवसाय करत आहे. अतिक्रमणाची कारवाईच जर करायची होती तर इतर अतिक्रमणांवर का कारवाई करण्यात येत नाही. या अतिक्रमण विरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईची कोणत्याही प्रकारची सूचना आम्हाला देण्यात आली नाही. तसेच महानगर पालीकेच्य़ा अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा पत्रक नाही. त्यामुळे प्रशासनाकडून करण्यात येणारी ही कारवाई अन्य़ायकारक आहे. आम्ही त्याचा निषेध करतो.”








