सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यात येईल
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामुळे गाभाऱ्याचा दरवाजा बंद राहणार आहे. त्यामुळे अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना दिवसभर घेता येणार नाही.
सकाळी 9 वाजता मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीचे कर्मचारी व श्रीपूजकांकडून गाभारा स्वच्छता कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे हा दरवाजा दिवसभर बंद राहणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यात येईल.
त्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दिवसभरात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येईल. ही उत्सवमूर्ती मंदिराच्या अंतरंगातील महासरस्वती मंदिराजवळ विराजमान करण्यात येणार आहे.
या मूर्तीचे दर्शन भाविकांना रांगेतूनच घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर महासरस्वती मंदिराजवळ विराजमान केलेली देवीची उत्सवमूर्ती पुन्हा गाभाऱ्यात नेण्यात येईल, असे श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर यांनी सांगितले.








