दिवसभरात तब्बल सव्वादोन लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला नेसवलेल्या काट पदर व नक्षीकामाच्या साड्यांबाबत महिला भाविकांमध्ये मोठे आकर्षण असते. याची अनुभूती नवरात्रोत्सवात येत आहे. गेल्या चार दिवसात महिला भाविकांनी 1 लाख 51 हजार रुपयांच्या साड्यांची खरेदी केली आहे. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने देवीच्या साडी विक्रीसाठी खास स्टॉलच उभारला आहे.
दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला (गुरुवारी) करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या मातंगी माता स्वरुपात पूजा बांधली होती. तसेच शुक्रवारी 26 रोजी साजरी होत असलेल्या ललिता पंचमीचे औचित्य साधून जुना राजवाड्यातील तुळजा भवानी मंदिरात तुळजा भवानी मातेची ललिता अंबिका रुपात पूजा बांधली होती.
दरम्यान, दिवसभरात तब्बल सव्वादोन लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी सोन्याच्या पालखी मेना आकारात फुलांनी सजवली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी म्हणजे सकाळी 8 ते साडे तीनपर्यंत मंदिरात महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, स्वऊपसंच भजनी मंडळ, स्वरांजली महिला भजनी मंडळ, विठ्ठल ऊक्मिणी महिला भजनी मंडळ, श्रीनिधी भजनी मंडळ व राधाकृष्ण भजनी मंडळाने भजन सेवा देताना देवदेवतांवरील भजने सादर केली.
बेबी केअर सेंटर सुरु…
अंबाबाई मंदिरजवळील शेतकरी संघकार्यालयानजिकच्या दर्शन मंडपात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व मॅमी पोको पॅट्स यांच्याकडून बेबी केअर सेंटरची (फिडींग सेंटर) उभारणी केली आहे. या सेंटरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.
पुण्यातील आदिनाथ वैद्य शास्त्रीय संगिताचा कार्यक्रम
अंबाबाई मंदिरात पुण्यातील शास्त्राrय गायक आदिनाथ मनोज वैद्य यांनी शास्त्रीय गायन केले. भारतरत्न स्वर्गीय भीमसेन जोशी व प्रख्यात गायिका एस. शुभलक्ष्मी यांच्याकडून पूर्वीच्या काळीत सतत सादर केले जाणारे कानडी भजन सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. ऊईकर कॉलनीतील नर्तना डान्स स्कूलच्या 35 मुलींनी मंदिरात सादर केलेल्या भरतनाट्यामलाही भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.








