राजेश क्षीरसागर यांची अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यास एकहजार कोटींचा निधी देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तात्काळ मंजुरी देवून एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान, मागणीचे निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याच तपासणी करून तो तातडीने सादर करण्याचे आदेश पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.
मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भेट घेवून निधी मागणीचे निवेदन सादर करून चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की : अंबाबाई मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तिपीठा पैकी एक असून दररोज लाखो भाविक येत असतात. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी अंबाबाई मंदिराचे दर्शन घेण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे परराज्यातूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात सणासुदीच्या दिवसामध्ये ही संख्या 5 लाखपर्यंत असते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने व पायाभूत सुविधांचा विकास झाल्याने दिवसागणिक भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील उपलब्ध सोयीसुविधा तोकड्या पडत आहेत. मंदिर परिसर शहराच्या मध्यवर्ती असून आजूबाजूला मोठ्या बाजारपेठा व निवासी संकुलाची निर्मिती झालेली आहे. मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता मंदिराचा विकास वाराणसी व मथुरा येथील मंदिराच्या धर्तीवर करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु आहेत. अंबाबाई मंदिराचा सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम टप्यात आहे. मंदिर परिसर हा लोकवस्तीने, व्यावसायिक दुकानांमुळे तसेच छोटे फेरीवाले यांच्यामुळे गजबजलेला असल्याने सदरचा परिसर नागरिकांवर कोणताही अन्याय न होता भूसंपादित करणे आवश्यक आहे. याकरिता परिसर विकासासोबतच भूसंपादानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी पार्किंगची, राहण्यासाठी भक्त निवासी संकुल, त्यासोबतच भाविकांसाठी दर्शन मंडप, सभा मंडप, विश्रांतीगृह यासारख्या सोयी सुविधा पुरविण्याचे नियोजन विकास आराखड्यात आहे. त्याकरिता एकहजार कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे. या निधीला मंजुरी द्यावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर चर्चा केली. त्यानंतर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना सदर आराखडा तपासून सादर करण्याचे आदेश दिल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.