प्रतिनिधी,कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती सुस्थितीतच आहे. तातडीने संवर्धन करण्याची कोणतीही गरज नाही. मात्र भविष्यात गरज भासल्यास संवर्धन करण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अंबाबाईच्या मूर्तीची झीज व संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या रासासनिक शाखेच्या तज्ञांना सकाळी मूर्तीची पाहणी केली. तज्ञांकडून मिळालेल्या अहवालानंतर रेखावार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अंबाबाईची मूर्ती ही सुस्थितीत असल्याचा पुनऊच्चार केला.
अंबाबाईची मूर्ती ही तब्बल 1500 वर्षापूर्वीची आहे. या मूर्तीची झीज झाल्यानंतर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली होती. यातून मूर्ती सुस्थितीत आली. त्यानंतरच्या पुढील काळात केलेले संवर्धन मात्र चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे काहीसे स्वरूप बदलले आहे. मूर्तीला काही प्रमाणात नुकसानही पोहोचले आहे, असा आरोप गेल्याच महिन्यात मूर्ती अभ्यासकांनी केला होता. त्याची शहानिशी करून पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने पाऊले उचलण्यासाठी 28 फेब्रुवारीला पुण्यातील राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने व कोल्हापूर पुरातत्व विभागाचे अविक्षक उत्तम कांबळे यांना अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात बोलवले होते. त्यांनी पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवालही दिला होता. मूर्ती ही सुस्थितीत आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या रासासनिक शाखेच्या तज्ञांच्या मार्गदर्शक सुचना घ्याव्यात, असे अहवालात नमुद केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडील तज्ञांशी संपर्क साधून त्यांना मूर्तीच्या पाहणीस येण्यास सांगितले होते.
मंगळवारी सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडील तज्ञ अधिकारी राजेश्वरी, शिवन्न कुमार, राम निगम व कोल्हापूर पुरातत्व विभागाचे अविक्षक उत्तम कांबळे हे अंबाबाई मंदिरात आले. त्यांना पूर्वी केलेल्या संवर्धन व पाहणीबाबतची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी समिती सचिव शिवराज नाईकवाडे व अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत देवीच्या मूर्तीची विविध अंगांनी पाहणी केली.
पाहणीमध्ये अंबाबाईची मूर्ती ही सुस्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच मूर्तीला धोका वाटावा, अशी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळे तातडीने संवर्धन करण्याची गरज वाटत नाही. भविष्यात आवश्यकतेनुसार संवर्धन करण्यात येईल, अशा निर्णयावर अधिकारी आले. यासंदर्भातील अहवालही अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे गेली पंधरा दिवस अंबाबाईच्या मूर्तीबाबत उलट-सुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आज सुनावणी
मूर्तीच्या संवर्धनावर आक्षेप घेत श्रीपुजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. याबाबत मंगळवारी सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर कोल्हापूर यांच्याकडे सुनावणी होणार होती. पण सुनावणीच होऊ शकली नाही. ही सुनावणी आज 15 रोजी होणार आहे, असे मुनीश्वर यांनी सांगितले.
मूर्ती संवर्धनावरून खेळखंडोबा नको…
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सकाळी तातडीने अंबाबाई मंदिरात येऊन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मूर्ती संवर्धनाबाबत खेळखंडोबा केला जाऊ नये, असे अधिकाऱ्यांना सांगितले. मूर्ती संवर्धनाबाबतची माहिती द्यावी, अशी विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांनी मूर्तीची माहिती देवस्थान समिती प्रशासक तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल, असे पवार यांना सांगितले.
Previous Articleसिंधुदुर्गात १६ व १७ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता
Next Article ‘राजाराम’साठी पारंपरिक विरोधक भिडणार









