प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : कोरोनापासून चांदीच्या उंबऱ्यापासून करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी बंदी होती.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशावरून बुधवारपासून चांदीच्या उंबऱ्यापासून अंबाबाईच्या दर्शनाला प्रारंभ झाला.पहाटेपासून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.रात्री उशिरापर्यंत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.तब्बल तीन वर्षानंतर चांदीच्या उंबऱ्यापासून दर्शन घेता आले,याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या चांदीच्या उंबऱ्यापासून दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.जवळपास तीन वर्षांनी अंबाबाईचे जवळून दर्शन मिळाल्याने बाहेर गावावरून आलेल्या भाविकांसह स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.राखीपौर्णिमा असल्याने जोतिबा डोंगराला गेलेल्या भाविकांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने दर्शन रांगेत शिस्त ठेवली होती.भाविकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दर्शन रांगेच्या शिस्तीचे पालन केले.अंबाबाईचे जवळून दर्शन घेण्याची आमची इच्छा पूर्ण झाल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या.









