दख्खन गावच्या नळपाणी योजनेचे पाईप मातीच्या ढिगाऱ्याखाली
देवरुख: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खन येथे शुक्रवारी रात्री 1. 30 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. दख्खन गावच्या नळपाणी योजनेचे पाईप मातीच्या ढीगाऱ्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्गावर चिखलाचे साम्राज्य असून एकेरी वाहतूक सुरू आहे. शनिवारी दरड हटविण्याचे काम दिवसभर सुरूच होते.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा आंबा घाट आहे. घाटात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सुरूंग लावण्याबरोबर डोंगराची कटाई करण्यात आली आहे.
मार्गाच्या वरच्या बाजूने कटिंग केलेल्या डोंगराला भेगा गेल्या असून ती माती खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच दख्खन येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजता मोठी दरड खाली कोसळली. याची माहिती महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्यास सुरूवात झाली. दीड तासाने दरडीचा काहीसा भाग मोकळा करण्यात यश आले. दीड तासानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली. सिमेंट नाले गाळाने भरल्याने ओहोळाचे पाणी थेट मार्गावरून वाहत आहे. मार्गाला ओढ्याचे स्वरुप आले आहे.
मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरडीखाली दख्खन गावच्या नळपाणी योजनेचे पाईप गाडले गेले आहेत. या गावच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रवी इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी येथे वाहतूक अखंडित रहावी, यासाठी यंत्रसामुग्रीसह सज्ज असले तरी त्यांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
दख्खनला रवी इन्फ्रा कंपनी करणार टँकरद्वारे पाणीपुरवठा
रवी इन्फ्रा कंपनीच्या नियोजनाच्या अभावामुळे दख्खन गावची नळपाणी योजना मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहे. त्यामुळे गावचा पाणी प्रश्न उभा ठाकला आहे. याची दखल गावचे माजी सरपंच मंगेश दळवी यांनी घेत जोपर्यंत नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी रवी इंन्फ्रा कंपनीकडे केली. ही मागणी कपंनीने मान्यही केल्याचे मंगेश दळवी यांनी सांगितले.








