अमेरिका, युरोपनंतर भारतात सेवा ः वस्तुंची डिलिव्हरी लवकर मिळणार
नवी दिल्ली ः
ऑनलाईन इ कॉमर्स कंपनी ऍमेझॉन डॉट कॉम यांनी आपल्या नव्या हवाई कार्गो सेवेचा भारतामध्ये शुभारंभ करण्याचे ठरवले आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीने अलीकडेच केली आहे. ऍमेझॉन कंपनीला आपल्या उत्पादनांची डिलिव्हरी कार्गो सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरेने देणे शक्य होणार आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये वाढत्या वस्तुविक्रीची दखल घेत ऍमेझॉनने देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपल्या कार्गो सेवेचे नियोजन केले आहे. कार्गो विमान सेवेमार्फत देशातील विविध शहरांमध्ये मालाची पोहोच केली जाणार आहे. यावेळी बोलताना ऍमेझॉन ग्लोबल एअरच्या उपाध्यक्षा सारा रोडस् म्हणाल्या, माल वाहतुकीसाठी पूर्णपणे समर्पित अशी कार्गो सेवा कंपनीची असणार असून खर्चावर नियंत्रण ठेवत कार्गो विमानांचे वेळापत्रक आगामी काळात ठरविले जाणार आहे. विविध उत्पादनांचा कार्गोच्या माध्यमातून पुरवठा करताना खर्चातही पारदर्शकता ठेवली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका आणि युरोपनंतर भारतामध्ये कंपनीची अशा प्रकारची समर्पित अशी कार्गो सेवा ठरणार आहे. 2016 मध्ये अमेरिकेमध्ये ऍमेझॉन एअरने बोइंग 737-800 कार्गो सेवा सुरू केली होती. याअंतर्गत त्यांची 110 जेट विमाने जगभरातील 70 हून अधिक ठिकाणी कार्गो सेवा देतात. मालवाहू विमानांमार्फत ऍमेझॉनएअर भारतात मुंबई, दिल्ली, बेंगळूर आणि हैदराबाद या ठिकाणी कार्गो सेवा सुरू करत आहे. यासाठी दोन विमानांचा वापर करण्यात येणार आहे. कार्गो सेवा देणारी भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी म्हणून ऍमेझॉनची गणना होत आहे. माल वाहतुकीची पोहोच करण्यासाठी डीएचएल ग्रुप अंतर्गत येणाऱया ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस यांच्याशी ऍमेझॉनने हातमिळवणी केली आहे.









