देवाने सगळी सृष्टी बनवली झाड वृक्ष, जंगलं, प्राणी आणि माणसंसुद्धा. पण सगळे आपापल्यातच मशगुल होते. कोणी कोणाशी बोलेना, चालेना, त्यावेळी झाडांनी, प्राण्यांनी आणि माणसांनी सगळ्यांनी देवाकडे तक्रार केली, हे काय देवा कोणी कोणाशी बोलत नाही, बघत नाही! मग देवाने माणसाला आणि निसर्गाला वेगवेगळी वरदानं द्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी झाडांना सांगितलं की तुम्हाला मी नक्की काहीतरी वेगळं देईन. सगळ्यांना आनंद झाला. एका जंगलात दोन वेली राहात होत्या. जुळ्या बहिणींसारख्याच. देव काही तरी देणार म्हंटल्याबरोबर, त्या भराभरा झाडांवरनं चढून थेट आकाशात पोहोचल्यासुद्धा. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, देवाने मोठी बाग तयार केलीये. त्या बागेमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं होती. देवाने त्यांचे स्वागत केलं आणि सांगितलं तुम्हाला इथलं जे आवडेल ते घ्या, त्या प्रत्येकाच्या पिशव्या फुलांमध्येच दडलेल्या आहेत. पण जे मी तुम्हाला देईन ते तुम्ही स्वत:साठी वापरायचं नाही. दुसऱ्याला देऊन टाकायचे. दोघींनी आनंदाने कबूल केलं. एका वेलीने पांढऱ्या रंगाचे फुल घेतलं आणि दुसऱ्या वेलीने पिवळ्या रंगाचं फुल घेतलं. दोघी जणींनी डोळे मिटले आणि देवबाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला. त्या दोघी परत पृथ्वीवर आल्या. आल्यानंतर पाहिलं तर त्यांच्या सगळ्या अंगावरती छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या होत्या. पूर्वी ह्या वेली एकट्याच असल्यामुळे कुठेही वर चढायच्या, झाडावर जाऊन बसायच्या. घराच्या छतावर जाऊन बसायच्या, आता मात्र फुलं जशी लागली तसं या वेलींना वर काही चढता येईना, तरीही पांढरी फुलं असलेली वेल हळूहळू मांडवावरती जाऊन बसली आणि पिवळे फुल जिने घेतलं होतं तिला मात्र फुलाचं खूप ओझं झालं. ती जमिनीवरच थांबली. यथावकाश दोन्ही वेलींना फुलं सुकल्यानंतर त्याच्या मागे फळ लागल्याचं दिसलं. पांढऱ्या फुलाच्या जागी लांबट फळ लागलं होतं तर पिवळ्या फुलाच्या मागे गोलसर गाठीच्या आकाराचं फळ लागलेलं होतं. जसजशी फळं मोठी होऊ लागली तसतशी वेलीवर गमतीशीर दिसू लागली. मांडवावर जी वेल चढली होती त्या वेलीला दुधी भोपळे लागले होते, खाली डोकं वर पाय …या स्थितीत लोंबकळत होते आणि खाली जमिनीवर जी वेल होती तिला मोठे मोठे लाल भोपळे लागले होते, कळशीच्या आकाराचे हे ढम्मक ढोल आणि लाल केशरी रंगाचे, त्यांना गंमत वाटू लागली, आजूबाजूची जी माणसं होती ती हळूहळू या वेलींकडे बघू लागली. त्यांच्यावर ती आलेली फळं त्यांच्या जेवणासाठी उपयोगी असल्याने ते घरी घेऊन जाऊ लागले. आणि मग माणसाची आणि वृक्षाची हळूहळू मैत्री वाढली, त्यांना आनंद झाला, आपली फळं दुसऱ्याच्या उपयोगी येतात आणि देवाने सांगितल्याप्रमाणे स्वत:च्या गोष्टी स्वत: खायच्या नाहीत याची प्रचिती आली. आता वेली आनंदाने जगू लागल्या, डोलू लागल्या माणसाची जगण्याची सोय होऊ लागली.
Previous Articleमाउंट एव्हरेस्टच्या उंचीचा विक्रम मोडीत निघणार
Next Article ‘तरुण भारत’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








