लवलिना, ओजस देवतळे, अभिषेक वर्मा, ज्योती व्हेन्नम सुवर्णपदकाच्या फेरीत
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय कंपाऊंड तिरंदाजांनी तीन पदके निश्चित केली आहेत. त्याचप्रमाणे महिला बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेनने अंतिम फेरी गाठत किमान रौप्य निश्चित केले असून तिने ऑलिम्पिक कोटाही मिळविला आहे.
भारताच्या कंपाऊंड तिरंदाजांनी मंगळवारी अप्रतिम प्रदर्शन करीत तीन पदके निश्चित केली आहेत. त्यात एक सुवर्ण व एक रौप्यपदकाचा समावेश आहे. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन ओजस देवतळेने परफेक्ट 150 गुण नोंदवत अंतिम फेरी गाठली तर अभिषेक वर्मानेही चमकदार प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठल्याने या दोघांतच सुवर्णपदकासाठी चुरस लागणार आहे. 21 वर्षीय देवतळेने द.कोरियाच्या सातव्या मानांकित यांग जाएवोनला अजिबात संधीच दिली नाही. त्याने 15 अॅरोजमध्ये पैकीच्या पैकी 150 गुण मिळविले. या पंधरापैकी 7 वेळा त्याने जवळजवळ मध्यबिंदूवर अचूक वेध घेतला होता. त्याने ही लढत 150-146 अशी जिंकल्यानंतर जल्लोष सुरू केला. अभिषेकने 2014 मध्ये रौप्य मिळविले होते. यावेळी तो सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. 34 वर्षीय वर्माने दक्षिण कोरियाच्याच अग्रमानांकित जू जाएहूनवर 147-145 अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे.
ज्योती व्हेन्नम अंतिम फेरीत

महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड विभागात ज्योती सुरेखा व्हेन्नमने अंतिम फेरी गाठताना आपलीच सहकारी अदिती स्वामीचा उपांत्य फेरीत पराभव केला. ज्योतीने अंतिम फेरी गाठत तिरंदाजीतील तिसरे किमान रौप्यपदकही निश्चित केले आहे. 2014 इंचेऑन आशियाई स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य मिळविले होते. त्या कामगिरीची यावेळी बरोबरी झाली. ज्योतीने अनुभवाचा वापर करीत अदितीवर 149-146 अशा फरकाने मात केली. या स्पर्धेत ज्योती पहिले सुवर्णपदक मिळविण्यास उत्सुक झाली आहे. यापूर्वी तिने 2018 व 2014 मध्ये रौप्य व कांस्य मिळविले होते, पण ते सांघिक विभागात होते. अदितीला कांस्यपदकासाठी इंडोनेशियाच्या रतिह झिलिझातीशी लढावे लागणार आहे. भारतीय तिरंदाज एकूण 10 प्रकारात पदकाच्या शर्यतीत असून त्यापैकी 4 वैयक्तिक विभागातील आहेत.
रिकर्व्हमध्ये निराशा
रिकर्व्ह विभागात मात्र भारतीय तिरंदाजांना ऑलिम्पिक कोटा मिळविता आला नाही. अंकिता भगत, भजन कौर बाहेर पडल्यानंतर अतानू दास व धीरज यांना उपांत्यपूर्व फेरीत शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. धीरजला कझाकच्या लफात अब्दुल्लिनकडून 5-6 असा पराभव पत्करावा लागला तर दासला चीनच्या कि झियांगुओकडून 23-29, 29-29, 30-28, 29-27, 28-29) (10-10ञ्) असे शूटऑफमध्ये पराभूत व्हावे लागले.
लवलिना सुवर्णपदकासमीप

महिलांच्या 75 किलो गट मुष्टियुद्धमध्ये वर्ल्ड चॅम्पियन लवलिना बोर्गोहेनने अंतिम फेरी गाठत ‘सुवर्ण’संधी मिळविली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणाऱ्या लवलिनाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळविले आहे. तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणाऱ्या थायलंडच्या बैसन मनिकोनचा पराभव केला.









