आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने एकदा ना एकदा वस्तूसंग्रहालय पाहिलेले आहे. अनेक प्रकारची वस्तुसंग्रहालये असतात. ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय, वैज्ञानिक संग्रहालय, नाण्यांचे संग्रहालय, पूर्वापारपासून आत्तापर्यंतच्या सौंदर्यप्रसाधनांचे संग्रहालय अशी विविध संग्रहालये जगात प्रसिद्ध आहेत. पण असेही एक संग्रहालय, आहे की. जेथे केवळ मानवी अस्थीपंजर (सांगाडे) पहावयास मिळतात, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही. हे संग्रहालय अमेरिकेतील फिलडेल्फिया येथे असून ते ‘मटर संग्रहालय’ म्हणून ओळखले जाते.
हे वैद्यकीय संग्रहालय असून त्यात केवळ मानवी अस्थीपंजर आणि मानवी हाडे आपल्याला पहायला मिळतात. हे सांगाहे आणि हाडे 1840 ते 1940 या 100 वर्षांमधील आहेत. या शतकभराच्या काळात विविध रुग्णालयांमध्ये ज्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या किंवा जी शवविच्छेदने करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून जी हाडे किंवा अवयव रुग्णांच्या शरीरांमधून काढण्यात आले, त्यांचे हे संग्रहालय आहे. त्याचप्रमाणे शवविच्छेदन केल्यानंतर राहिलेले सांगाडेही येथे ठेवण्यात आले आहेत. या संग्रहालयाची स्थापना काही अस्थिरोग विषारदांनी केली होती. या संग्रहालयात किमान 6,500 हाडे आणि सांगाडे ठेवण्यात आले आहेत. आता तेथे जागा न उरल्याने काही हाडे किंवा सांगाडे रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा वारसदारांना परत देण्याचा निर्णय झाला असून त्याचे क्रियान्वयनही होत आहे.
हे संग्रहालय स्थापन करण्यामाचा हेतू उदात्त आहे. वैद्यकीय विद्यार्थी किंवा शल्यचिकित्सक यांना विविध मानवी हाडांचा किंवा सांगाड्यांचा एकाच स्थानी अभ्यास करता यावा. तसेच विविध रोग किंवा विकारांमुळे हाडांची, तसेच अस्थिपंजरांची स्थिती कशी होते, हे अभ्यासता यावे. त्याचप्रमाणे वैद्यकीय नितीमत्ता आचरणात आणण्याची वृत्ती त्यांच्यात जागृत व्हावी किंवा जागृत रहावी, यासाठी या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. आज हे संग्रहालय सर्वसामान्यांच्याही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. प्रत्येक वर्षी सहस्रावधी लोक ते पाहण्यासाठी येतात. वैद्यकीय विद्यार्थी तर येथे अभ्यासासाठी येतच असतात. हे संग्रहालय पाहण्याचा अनुभव अद्भूत होता, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.









