कित्येक शतके जुने रहस्य उलगडणार
इस्रायलमध्ये एका ‘अद्भूत’ स्ट्रक्चरचा शोध लागला आहे. दगडांनी तयार हे स्ट्रक्चर इस्रायलमधील एटलिट शहरानजीकच्या समुद्रात आढळून आले आहे. या शोधामुळे आता शतकांपेक्षा जुन्या स्टोनहेंज रहस्याची उकल होण्यास मदत होणार आहे.

स्टोनहेंज ब्रिटनच्या विल्टशायर काउंटमधील एक प्रसिद्ध प्रीहिस्टोरिक स्ट्रक्चर आहे. यात दगडांच्या मोठ्या शिलांना जमिनीत गाडून एक चक्र तयार करण्यात आले आहे. दगडांच्या या वर्तुळाकृती संरचना पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक ब्रिटनमध्ये पोहोचत असतात. परंतु हजारो वर्षे जुन्या या संरचना जगभरात आढळून येतात. यातील काही संरचना संशोधकांसाठी रहस्य ठरल्या असून यात स्टोनहेंज देखील सामील आहे.
ही अद्भूत संरचना एटलिट शहरानजीकच्या समुद्रात आढळून आली आहे. मेरीटाइम ऑर्कियोलॉजिस्ट एहुद गॅलिली यानी जहाजांच्या अवशेषांच्या शोधासाठी समुद्रात उडी घेतल्यावर त्यांना एक प्राचीन भिंत आढळून आली. यानंतर तेथे अनेक लोकांचे सांगाडे देखील आढळून आले. पथकाला जवळपास 15 घरांचे अवशेष आढळून आले. एकेकाळी त्या ठाकणी राहणाऱ्या लोकांची संख्या 70-150 दरम्यान असावी. अधिक अध्ययनात तेथे 40 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेले एक विशाल स्थळ असल्याचे दिसून आले. हे स्थळ सुमारे 9 हजार वर्षे जुने होते. हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या मानवी वस्तींपैकी एक आहे. त्याच्या केंद्रात एका रहस्यमय दगडाची वर्तुळाकृती संरचना सुस्थितीत उभी होती असे गॅलिली यांनी सांगितले.









