वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेटपटूंचा विक्रम नोंदवला जातच आहे पण आता यामध्ये प्रेक्षकांच्या विक्रमाची भर पडली आहे. आयसीसीतर्फे आतापर्यंत आयोजिलेल्या स्पर्धांच्या इतिहासामध्ये 2023 ची विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांच्या उपस्थितीची विक्रमी म्हणून ओळखली जाईल. आतापर्यंत या स्पर्धेला किमान 10 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. या स्पर्धेतील हा उच्चांक म्हणून नोंदविला गेला आहे.
अफगाण आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यावेळी प्रेक्षकांनी खूपच गर्दी केली होती. दरम्यान या स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा आकडा 10 लाखांपेक्षा जास्त झाल्याचे आढळून आले आहे. सदर माहिती आयसीसीच्या स्पर्धा आयोजन विभागाचे प्रमुख ख्रिस टीटेली यांनी दिली आहे. आता या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन सामने आणि त्यानंतरचा अंतिम सामना होणार आहे. या तीन सामन्यावेळी पुन्हा प्रेक्षकांची तुडूंब गर्दी पहावयास मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.









