मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ महामार्गही बंद
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर थांबवण्यात आली आहे. हवामानात सुधारणा होताच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांनी अमरनाथला भेट दिली आहे.
उत्तराखंडमधील चमोली येथे डोंगरावरून दगड पडल्याने बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या 10 दिवसात हा महामार्ग चौथ्यांदा बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील कालका-सोलन महामार्गावर डोंगरातून अचानक दगड कोसळू लागले. डोंगरावरून कोसळलेल्या भल्यामोठ्या दगडापासून सुदैवानेच एक कार थोडक्मयात बचावली. हवामान खात्याने येत्या 24 तासात बिहार आणि तेलंगणा वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. देशभरात गुरुवारी खराब हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. एकट्या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात वीज पडून 13 जणांना जीव गमवावा लागला. दक्षिणेत केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. कन्नूर आणि कासारगोडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलप्पुझा येथील सखल भाग जलमय झाला आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक हजाराहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.









