भाविकांची पहिली तुकडी रवाना
वृत्तसंस्था/ जम्मू
बहुप्रतीक्षित बाबा अमरनाथ यात्रा सुरू झाली असून भाविकांची पहिली तुकडी जम्मूमधून रवाना झाली आहे. मोठय़ा संख्येत भाविक यंदा अमरनाथ यात्रेकरता पोहोचले आहेत. जम्मूच्या शिबिरात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भाविकांच्या पहिल्या तुकडीला ध्वज दाखवून रवाना केले आहे.
सुमारे 3 हजारांहून अधिक भाविक बुधवारी पहाटे काश्मीर खोऱयासाठी रवाना झाले. ही यात्रा कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांनी होतेय. दहशतवादी हल्ल्याचा धोका असूनही मोठय़ा संख्येत भाविक यात्रेसाठी पोहोचले आहेत. उपराज्यपाल सिन्हा यांनी विधिवत रुपात बाबा अमरनाथ यात्रेस प्रारंभ करण्यापूर्वी पूजा केली. यात्रेची सुरुवात 30 जूनपासून पारंपरिक दुहेरी मार्गाने होणार आहे. एक मार्ग दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 48 किलोमीटर लांबीचा आहे. दुसरा मध्य काश्मीरच्या गांदरबलमध्ये 14 किलोमीटर अंतराचा आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मूपासून काश्मीरपर्यंत भाविक मोठय़ा बंदोबस्तात ही यात्रा पूर्ण करणार आहेत. भाविकांची पहिली तुकडी रवाना होण्यापूर्वी सुरक्षा दलांनी शिबिरातील सर्व वाहनांची तपासणी केली. विविध यंत्रणांनी कठोर चौकशी केल्यावरच वाहनांना रवाना करण्यात आले.
सीआरपीएफचे बाइक स्क्वॉड कमांडो भाविकांना सुरक्षा प्रदान करत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर नजर ठेवण्यात येत आहे. यात्रेपूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. भाविकांच्या वाहनांवर रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन टॅग लावण्यात आले आहेत.









