आम आदमी पक्षाच्या नेत्यावर ईडीची कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वक्फ मालमत्तेच्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीतील आम आदमी पक्षाचा नेता अमानुल्ला खान याला प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) अटक केली आहे. त्याच्या विरोधात मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी त्याची ईडीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती निदेशालयाच्या संदेशात देण्यात आली आहे.
त्याला दिल्लीतील ओखला येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. सोमवारी सकाळीच त्याच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले होते. यावेळी या भागात दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्याच्या घराभोवती मोठा जमाव जमला होता. मात्र, पोलिसांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळून अटक करण्यास साहाय्य केले.
आरोपांचा इन्कार
खान याने त्याच्यावरील आरोपांचा इन्कार केला. ‘एक्स’ वरुन प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये त्याने केंद्र सरकार आपल्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करीत आहे, असा दावा केला आहे. आपल्याला आणि आम आदमी पक्षाच्या अन्य नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी केंद्र सरकार अशी कारवाई करीत आहे. मी प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करीत आहे, हा अपराध समजला जात आहे. आपण कारवाईला घाबरत नाही, असा आशय त्याच्या पोस्टमध्ये आहे.
सिसोदिया यांच्याकडून पाठिंबा
अमानुल्ला खान याच्या वक्तव्याला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पाठिंबा दिला आहे. ईडीचा उपयोग विरोधातील आवाज दाबून टाकण्यासाठी केला जात आहे. ईडीला आता केवळ हेच काम उरले आहे. भारतीय जनता पक्षाविरोधात जे आवाज उठवितात, त्यांना कारागृहात टाका, असा ईडीचा खाक्या आहे, असा दावा सिसोदिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सोमवारी केला.
प्रकरण काय आहे…
2015 मध्ये अमानुल्ला खान हा दिल्ली वक्फ मंडळाचा अध्यक्ष होता. तो आम आदमी पक्षाचा अग्नेय दिल्लीच्या ओखला मतदारसंघातील आमदार आहे. वक्फ मंडळाचा अध्यक्ष असताना त्याने पदाचा दुरुपयोग करुन वक्फ मालमत्तेचा भ्रष्टाचार केला आणि बेकायदेशीर मार्गाने पैसा कमावला असा त्याच्यावर आरोप आहे. 2016 मध्ये त्याच्यावर प्रकरण नोंद करण्यात आले आहे. दिल्ली वक्फ मंडळात त्याने अस्तित्वात नसलेल्या पदांवर अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा बनाव केला आणि या कर्मचाऱ्यांचे वेतन स्वत:च्या खिशात टाकले, असा आरोप आहे. त्याच्या या गैरकृत्यामुळे दिल्ली सरकारची आर्थिक हानी झाली आणि त्याने स्वत:साठी बेहिशेबी पैसा कमावला असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. बराच काळ त्याची चौकशी केली जात आहे.









