अनेक साहित्यिकांची मांदियाळी,पूज्य साने गुरुजींना समर्पित : लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
अमळनेर/सागर जावडेकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज शुक्रवारपासून अमळनेरच्या पूज्य साने गुऊजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय येथील विशेष अशा सभा मंडपात होत असून अमळनेर शहरात मराठी साहित्य विश्वातील अनेक साहित्यिकांची मांदियाळी उपस्थित झाली आहे. आज सकाळी 11 वाजता संमेलनाचे थाटात उद्घाटन होणार आहे अमळनेर हे जळगावपासून पन्नास किलोमीटर दूरवर असलेले एक मध्यवर्ती असे गाव या गावाची व्याप्ती तशी मर्यादित आहे परंतु साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हे संमेलन पूज्य साने गुऊजी यांनाच समर्पित करण्यात आलेले आहे. मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर यांनी पुढाकार घेऊन हे 97 वे साहित्य संमेलन दि. 4 फेब्रुवारीपर्यंत आयोजित केले आहे. अमळनेरची साहित्य नगरी माणसाने फुलली आहे. 57 वर्षांनंतर प्रथमच या गावात हे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर यांचे आगमन येथे झालेले आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन या गुऊवारी सायंकाळी अमळनेर शहरात पोहोचल्या. सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे विधिवत उद्घाटन होईल. संमेलनाचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रवींद्र शोभणे हे गुऊवारी अमळनेरला पोहोचले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूर्व संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर या संमेलनाला काही कारणास्तव पोहचू शकणार नाहीत.
या संमेलनात मोठ्या प्रमाणात युवावर्गाला सहभागी करून घेतलेले असून प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला भव्य अशा प्रमाणात ग्रंथ संमेलनाचेही आयोजन केलेले आहे. या ठिकाणी दोन तात्पुरती सभागृह निर्माण केली असून तिथे संमेलनाचे कार्यक्रम होतील. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ होणार आहे. यावेळी प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीला प्रारंभ होईल आणि त्यानंतर ध्वजारोहण होईल अशोक भाऊ जैन हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या उद्घाटन समारंभाला निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव आहे. त्याचबरोबर भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खानदेशचे श्रद्धास्थान असलेले प.पू. सद्गुरु प्रसाद महाराज यांचे आशीर्वचन होईल. मृण्मयी भाजक आणि दिगंबर महाले हे या संमेलनाचे सूत्रनिवेदन करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता परिसंवाद, सायंकाळी कविसंमेलन व रात्री 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. संमेलनानिमित्त अमळनेर नगरी सजविण्यात आलेली आहे. आयोजकांची बरीच धावपळ उडालेली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेले आहेत.