केपेतील ‘प्रशासन तुमच्या दारात’ उपक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे उद्गार : जनतेने सरकारी योजना जाणून त्यांचा लाभ घ्यावा
वार्ताहर /केपे
राज्यातील सरकार हे जनतेचे असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेले आहे आणि यापुढेही राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केपे येथे ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा 2.0’च्या अंतर्गत ‘प्रशासन तुमच्या दारात’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, कुडचडे नगराध्यक्षा डॉ. जस्मिन ब्रागांझा, जि. पं. सदस्य खुशाली जो. वेळीप, सिद्धार्थ गावस देसाई, शाणू वेळीप, संजना वेळीप, अधिकारी डॉ. व्ही. चंदावेलू, अश्विन चंद्रू, उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर व इतर हजर होते. राज्यातल्या 191 पंचायती व 14 पालिकांत आज शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत प्रशासकीय अधिकारी बसून सरपंच, पंच, नगरसेवक यांच्यासोबत जनतेसाठीच्या दहा योजनांची माहिती देतील, याकडे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी लक्ष वेधले. आई-वडील नसलेल्या मुलांना 3 हजार रुपयांचे साहाय्य देणारी योजना राबविली जाते. रस्ता अपघातात बळी गेल्यास 2 लाख ऊ. दिले जातात. अशा सरकारच्या 121 योजना आहेत. त्यांचा लाभ जनतेला मिळणे गरजेचे आहे. कोविड काळात 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. वीज, पाणी व रस्ते या मूलभूत सुविधा जनतेला मिळणे गरजेचे आहे व त्याकरिता सरकार सदैव प्रयत्नशील राहिलेले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले.
सर्व सरकारी शाळांचे नूतनीकरण करणार
येणाऱ्या काळात सर्व सरकारी शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल. सरकारी कार्यालय, पंचायत, शाळा याकरिता सरकारी जागा देण्यास काहीच हरकत नाही. कारण ती कोणाला वैयक्तिक कारणासाठी दिली जात नाही, तर लोकांकरिता दिली जाते. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य तितके सारे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी बाराही तालुक्यांत बारा मंत्री उपस्थित राहिलेले आहेत. हे सरकार लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविणारे आहे. जनतेने आपल्या समस्या मांडाव्यात तसेच एक पाऊल पुढे टाकत सरकारच्या योजना जाणून घेऊन त्यांचा लाभही घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आमचे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या संकल्पना साकार करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्र व नोडल अधिकारी गेली तीन वर्षे सातत्याने काम करत आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहून स्वयंपूर्ण व्हावी आणि संपूर्ण गोवा स्वयंपूर्ण व्हावा हे ध्येय आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
आमदारांनी मांडले विविध प्रश्न
मुख्यमंत्र्यांनी केपे येथे येऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल आपण आभारी आहे. केपेत अनेक प्रश्न आहेत. केपे पालिकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आहे, मात्र ती अजूनही सर्वांकरिता खुली करण्यात आलेली नाही. सदर इमारत त्वरित खुली करावी. तसेच दियांव, केपे येथे उभारण्यात येत असलेले क्रीडा मैदान सात वर्षे झाली, तरी पूर्ण झालेले नाही. ते त्वरित पूर्ण करण्यात यावे. कारण क्रीडा संकुल सोडले, तर या भागात आणखी मैदान नाही, याकडे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी लक्ष वेधले. बेतूल येथील 8 लाख चौ. मी. जागा फूड पार्ककरिता सरकारने घेतली होती. त्यातील 25 हजार चौ. मी. जागा स्थानिक पंचायतघर, मैदान, आरोग्य केंद्र, वाचनालय उभारण्यासाठी द्यावी. पाडी, मोरपिर्ला भागांतील सरकारी शाळा चांगल्या परिस्थितीत नाहीत. त्यांचे नूतनीकरण करावे. तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी ‘डिफेन्स एक्स्पो’च्या वेळी फातर्पा पंचायतीला नवीन पंचायतघर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. अजूनही त्याचा विचार झालेला नाही. वावुर्ला या दुर्गम भागातील गावात अजूनही रस्ता होत नाही. निविदा काढूनही काम हाती घेतलेले नाही. उन्हाळ्यात पाडी, मोरपिर्ला भागांत पाण्याची समस्या भेडसावते. ती दूर करावी. तसेच केपेत कोणतेही कार्यक्रम करायचे झाल्यास योग्य सभागृह नाही. त्यामुळे केपेत रवींद्र भवन उभारावे, अशा मागण्या आमदार डिकॉस्ता यांनी केल्या. आम्हाला राजकारण करायचे नाही. केपेचा विकास व्हावा हेच ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सागितले. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आणि स्वयंपूर्ण गोवाचे मुख्यमंत्र्यांचे ध्येय आहे. स्वयंपूर्ण मित्र ही चांगली योजना मुख्यमंत्र्यांनी राबवली आहे, असे चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.









