सावंतवाडी / प्रतिनिधी
संस्थांनच्या राजघराण्याच्या माध्यमातून येत्या सप्टेंबर महिन्यात महोत्सव घेण्यात येईल असे भाजपचे युवा नेते श्री लखम सावंत भोसले यांनी स्पष्ट केले. ओंकार कला मंच डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंंबकर, कोरिओग्राफर अनिकेत आसोलकर, खास मुंबईतून आलेले कोरिओग्राफर मंदार काळे, गणेश भालचिम, वैष्णवी अहीवळे आदी उपस्थित होते.
यावेळी लखमराजे पुढे म्हणाले, सावंतवाडी संस्थांनच्या माध्यमातून नेहमीच कला जोपासण्याचा प्रयत्न झाला आहे. सावंतवाडी हे कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ओंकार कलामंच तसेच सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या अन्य ग्रुप कडून कलाक्षेत्रात सुरू असलेले काम हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सात दिवसाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.









