अध्याय सहावा
जे ज्ञानी लोक ईश्वराला जाणतात ते अंतकाळी श्रद्धेने ईश्वराचे स्मरण करून मुक्त होतात, ह्या अर्थाचा य: स्मृतवा त्यजति प्राणमन्ते मां श्रद्धयान्वितऽ । स यात्यपुनरावृत्तिं प्रसादान्मम भूभुज ।। 16 ।। हा श्लोक आपण पहात आहोत.
ज्यांना वस्तुस्थितीची जाणीव झालेली आहे त्यांना हा सर्व ईश्वराने मांडलेला मायेचा पसारा आहे हे लक्षात येतं व यात गुंतून पडण्यात अर्थ नाही, याची जाणीव होते. यातून आपल्याला सोडवणारा केवळ ईश्वरच आहे हेही लक्षात येतं. अशी पार्श्वभूमी तयार झाली की, मनुष्य ईश्वराची भक्ती करू लागतो. हळूहळू त्यात त्याला अवर्णनीय आनंद मिळू लागतो. त्या कायम टिकणाऱ्या आनंदापुढे संसारिक गोष्टीतून मिळणारा, वस्तू, व्यक्ती व परिस्थितीवर अवलंबून असलेला आनंद त्याला गौण वाटू लागतो. त्यामुळे तो आनंद अधिकाधिक आणि अविरत मिळत रहावा म्हणून तो सदैव ईश्वराची भक्ती करत असतो. कायम त्याचे नाम ओठावर असल्याने त्याला सर्व प्रापंचिक गोष्टीचा विसर पडलेला असतो. संसारात जीव गुंतलेला नसल्याने अंतकाळी ईश्वराचं नाव त्यांना सहजी आठवतं. त्यांच्यावर ईश्वराची कृपा होऊन तो जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होतो.
हे वाचताना मनाला पटतं, सहज सोपं वाटतं पण प्रत्यक्ष आचरणात आणायला कर्मकठीण असतं. म्हणून मृत्यूसमयी प्रत्येकाच्या तोंडी ईश्वराचं नाव येतंच असं नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे संसारिक गोष्टींचा विचार मनुष्य अहोरात्र करत असतो. त्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची त्याला चिंता लागून राहिलेली असते. एव्हढंच नव्हे तर त्याला पडणारी स्वप्नेही त्या गोष्टींशी निगडित असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात ते यासाठीच आणि हीच बाब अंतकाळी मनुष्याला नाडते. त्याला अंतकाळी ईश्वराचे स्मरण न होता संसारिक गोष्टी आठवतात. ज्या गोष्टीचे चिंतन करण्यात आयुष्य घालवलं तीच वस्तू मृत्यूसमयी आठवत राहते आणि मनुष्य जन्ममृत्युच्या चक्रात वारंवार अडकत राहतो. हे टाळण्यासाठी, मरणाचे स्मरण असावे। हरिभक्तीसी सादर व्हावे। असे संत आग्रहाने सांगत आले आहेत. सुरवातीला नामस्मरणात रस वाटत नसला तरी रोज नित्यनेमाने उठता, बसता, खाता, पिता नामस्मरण केले तर काही काळाने त्याची सवय जडते. त्यातच दंग रहावे असे वाटते. म्हणून सतत नामाच्या संगतीत रहावे. सहवासाने प्रेम वाढते. आईचे लेकरावर एव्हढे प्रेम का असते तर नऊ महिने तिने त्याला सतत बरोबर वागवले असते. तसेच माणसाने सतत नामाचा सहवास करावा. त्यामुळे त्याची चित्तशुद्धी होत राहते, नामाशिवाय अन्य विचार बाजूला पडतात. त्यामुळे नितीधर्माचे पालन आपोआपच होत राहते. नाम नव्याने घ्यायला सुरवात केली की, नाम घेत असताना मनात अनेक विचार येतात आणि नाम घेणाऱ्याची एकाग्रता भंग पावते. परंतु असे घडू लागल्यावर साधकाने डगमगून जाऊ नये. मनात येणाऱ्या विचारांना अडवू नये कारण ते थांबा म्हणून थांबत नाहीत. फक्त एक करावे मनात जरी विचार येऊ लागले तरी त्याला फाटे फुटून देऊ नयेत. सरावाने नाम घेत असताना मन स्थिर होते. सुरवातीला नामाचा हिशोब वगैरे ठीक आहे कारण त्यातून नामस्मरण करण्याची सवय लागते. ह्याप्रमाणे सतत नाम घेण्याचा जिभेला चाळा लागतो. ह्या चाळ्यातूनच शेवटी ईश्वराचे स्मरण होते व त्याच्या कृपेने अंतकाळ साधला जातो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळची काळजी करू नये. त्याने आयुष्यभर ईश्वर स्मरणात राहून त्याची कर्तव्ये निरपेक्षतेनं पार पाडली तर त्याचा अंतकाळ साधून द्यायची जबाबदारी माझी आहे. ज्यांना शारीरिक व्याधीमुळे, अंतकाळी शुद्ध रहात नाही त्यावेळी मी त्यांच्यासाठी नामस्मरण करत असतो.
क्रमश:








