राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा यांची ग्वाही
प्रतिनिधी/ सातारा
मराठा तितुका मेळवावा, मराठा तितुका घडवावा असे म्हटले जाते. त्याप्रमाणे मराठा बिझनेस फोरमने मराठा समाजाला संघटीत करण्याचे काम सुरु केले आहे. उद्योजक बनवण्याचे कार्य सुरु केले आहे. मराठा समाजाबाबत काही गैरसमज आहेत. एकत्र येत नाही आला तर टिकत नाही. उद्योग व्यवसाय करत नाही. केले तर चालत नाही, पण या सगळय़ाला छेद देण्याचे काम मराठा बिझनेस फोरमने करुन दाखलले आहे. एकत्र येवून उद्योजक घडवले जात आहेत. देशाच्या, जगाच्या पातळीवर मराठा उद्योजक तयार होत आहेत. मराठा तरुणांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तप्तर आहे, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दिली.
वाढे(ता. सातारा) येथील वेदिका लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे – पाटील, माजी नगरसेवक धंनजय जांभळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, मराठा समाजाबत जे गैरसमज आहेत ते गैरसमज या फोरमने दुर केले आहेत. सगळ्यांनी एकत्र आल्यावर उधोजक तयार होऊ शकतो. मराठा तरुणांनी व्यापार, उद्योग याकडे वळावे. एकमेकांना सहकार्य करावे. असे म्हटले जाते व्यापार हा स्वतःच्या पैशावर करण्यापेक्षा दुसऱयाच्या पैशावर करण्याचे शहाणपपण असले पाहिजे. अंबानी, अडानी यांच्याकडून खूप काही मराठा तरुणांना शिकता येईल. अदानी यांनी तर बाजारातूनच पैसा उभा केला आणि त्यावर व्यवसाय वाढवला आहे. आपल्या जुन्या लोकांनी कर्जाबाबत मनात बिंबवले गेले आहे. येणारी आव्हाने स्विकारली पाहिजेत. काळाप्रमाणे बदलेले गेले पाहिजे. त्या त्या भागातल्या राजकारणी मंडळींनीही जरी विचारधारा वेगळय़ा पक्षाची असली तरीही मराठा समाजाच्या उद्योजकांना आडकाठी आणली गेली नाही पाहिजे. सहकार्याची भूमिका राहिली पाहिजे. व्यवसाय, उद्योग आपल्या भागात सुरु होत असेल तर तो एक प्रकारचा विकासच आहे.
निवेदक आणि व्याख्याते यांच्यावर दादांनी मांडले मत
निवेदन करणाऱया निवेदकांवर पाठीमागेही एकदा अजितदादांनी स्पष्ट शब्दात बजावले होते. आताही या कार्यक्रमात निवेदकाने जास्त उठाबशा करायला लावल्याची खंत अजितदादांनी व्यक्त केली. तसेच आपल्या भाषणात त्यांनी व्याख्याते नामदेवराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. नामदेवराव जाधव हे सतत कृतीतून घडा असे सांगतात मात्र नामदेवराव हे फक्त भाषणे देवून पैसे कमवतात, अशी फिरकी घेतली. यावेळी मराठा उद्योजक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मराठा बिझनेस फोरमच्या पदाधिकाऱयांचा पदग्रहण सोहळा पार पडला. अजितदादांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. स्वागत मराठा बिझनेस फोरम्चे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक उपाध्यक्ष मनोज देशमुख यांनी केले तर आभार जगदीश शिर्के यांनी मानले.









